Palghar Rain Pudhari
पालघर

Palghar Rain: उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा; पालघरात बरसल्या पावसाच्या सरी

शेतकरी चिंतेत

पुढारी वृत्तसेवा

पालघर: पालघर जिल्ह्यात रविवारी सकाळच्या सुमारास काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पावसाच्या सरी बरसल्या आहेत. पावसाच्या हलक्या सरी बरसल्याने मागील काही दिवसांपासून उन्हाच्या तडाख्याने ग्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र पिकांच्या काळजीने शेतकरी मात्र धास्तावले आहेत.

पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणू तालुक्यात रविवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. चारोटी, कासा, उर्से, दाभोण या ग्रामीण भागात रविवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास अचानक हलक्या पावसाच्या सरी बरसल्या. ढगाळ वातावरणाचा हलक्या पावसाच्या सरी बरसल्याने उकाड्याने त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.

मात्र अचानक अवेळी पाऊस पाऊस बरसल्याने व ढगाळ वातावरण निर्माण फळ बागायतदार, भाजीपाला, फुल शेती आणि भाताची लागवड केलेल्या शेतकऱ्यांमध्ये नुकसानीच्या भीतीने चिंता निर्माण झाली. वीटभट्टी व्यावसायिक देखील धास्तावले आणि अनेकांनी पावसापासून संरक्षणासाठी उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात पश्चिम महाराष्ट्र (प्रामुख्याने घाट परिसर), खान्देश, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये 20 ते 22 एप्रिलदरम्यान दुपारनंतर काही प्रमाणात ढगाळ हवामान आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या कालावधीत विजांचा कडकडाट, पाऊस; तसेच काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, काढणी केलेली पिके सुरक्षित ठेवावीत, शेतीची कामे हवामानानुसार नियोजित करावीत आणि वादळी वारे व गारपीटीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान बदलत्या वातावरणाच्या परिणामामुळे गेल्या काही वर्षांमध्ये बळीराजाचा जिव टांगणीलाच लागल्याचे चित्र आहे. अवकाळी , गारपीट,वादळ वारे यामुळे शेतीतील विविध पिकांचे मोठे नुकसान झाल्याची अनेक उदाहरणे आहेत.त्यामुळे अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरीही धास्तावले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT