Guardian Minister Ganesh Naik's orders to the administration in the district planning meeting
पालघर : पुढारी वृत्तसेवा
पालघर जिल्ह्यात आतापर्यंत अवकाळी पाऊस, वादळ वारा यामुळे झालेल्या सर्व नुकसानीच्या भरपाईचे प्रस्ताव सरकारकडे पाठवावेत व नैसर्गिक आपत्तीच्या पंचनाम्यापासून कोणीही बाधित वंचित राहता कामा नये अशा सूचना वनमंत्री तथा पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी प्रशासनास दिल्या. नैसर्गिक आपत्तीसंदर्भात पालघरच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहीर आत्माराम पाटील नियोजन सभागृहात सोमवारी त्यांनी घेतलेल्या बैठकीत या सूचना केल्या.
यापूर्वी घेतलेल्या मान्सून आढावा बैठकीमध्ये सूचना देऊनही काही ठिकाणी त्रुटी राहिल्या आहेत. त्या त्रुटी दूर करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले. सूचना केल्यानंतर नुसत्या चर्चा नको तर दिलेली कामे यांची अंमलबजावणी करून ती प्रत्यक्षात पूर्ण करा असे निर्देशही पालकमंत्री नाईक यांनी प्रशासनाला या निमित्ताने दिले. वसई येथील महावितरण व्यवस्थेची काही दुरावस्था याचे उदाहरण देत त्यांनी मान्सूनपूर्व कामाची माहिती जाणून घेतली. केलेल्या व दिलेल्या कामांची पूर्तता न केल्यास जन उद्रेक भडकण्याची शक्यता आहे. हे योग्य नसल्याचे पालकमंत्र्यांनी प्रशासनातील अधिकारी वर्गाला सांगितले.
सद्यस्थितीत कोविड डोके वर काढू लागला आहे. अशा वेळेला मास्क, सॅनिटायझर व संबंधित साहित्य, यंत्रणा सतर्क करणे व त्याची तरतूद करणे आवश्यक असल्याचे नाईक यांनी प्रशासनाला सांगितले. तालुक्याच्या ठिकाणी स्वच्छ व सोयीयुक्त कोविड सेंटर उभे करा,अखेर ही सर्वांची जबाबदारी आहे. ती सर्वांनी नैतिकतेने पार पाडा असे आदेश पालकमंत्र्यांनी संबंधित यंत्रणांना दिले. जिल्ह्यातील सार्वजनिक आस्थापना व ठिकाणे निर्जंतुकीकरण करा असेही त्यांनी म्हटले.
यावेळी राज्याच्या कृषी मूल्य समितीचे अध्यक्ष पाशा पटेल, खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावित, राज्याच्या मुख्य वन संरक्षक प्रदीपा, जिल्हाधिकारी डॉक्टर इंदू राणी जाखड, जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, डहाणू व जव्हार प्रकल्पाधिकारी, डहाणू व जव्हार उपवनसंरक्षक, उपजिल्हाधिकारी प्रांत अधिकारी तहसीलदार तसेच जिल्ह्यातील इतर विभागाचे प्रमुख या आढावा बैठकीला उपस्थित होते.
जिल्ह्यात प्लास्टिक मुक्तीची संकल्पना चांगली राबवली जात असून अधिकारी वर्गाचे काम व मोहिमेतील सहभाग चांगला आहे. त्यामुळे प्रशासनाचे कौतुक करावेच लागेल असे गौरवोद्गार त्यांनी प्रशासनासाठी काढले. तर अवकाळी पाऊस व वादळी वार्यांमुळे विक्रमगड तालुक्यात महावितरण ची मोठी हानी झाली होती नागरिकांना तातडीने वीज मिळवून देण्याच्या दृष्टीने महावितरण ने केलेले प्रयत्न वाखाण्याजोगी असल्याने त्यांचे कौतुक करणे आवश्यक असल्याचे यावेळी खासदार सावरा यांनी सांगितले. महामार्ग निकृष्ट दर्जाचा बनला असून नागरिकांच्या सुखर प्रवासासाठी प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेऊन रस्ता चांगला होईस्तोवर ताब्यात घेऊ नका अशा सूचना दिल्या. महामार्गावर अवजड वाहनांकडून लेनची शिस्त पाळली जात नाही.
ती पाळण्यासाठी परिवहन खात्याने विशेष लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांनी प्रतिपादित केले. महामार्गावर एका तासाच्या प्रवासासाठी दोन ते अडीच तास लागत आहेत. रुग्ण, बालके, महिला यांना त्याचा फटका बसत आहे. त्यामुळे महामार्गावरील ही बाब गांभीर्याने घेऊन प्रवासी वर्गाला सुविधा पुरवणे हे आपले कर्तव्य आहे असे सर्वांनी लक्षात ठेवावे असे यावेळी पालकमंत्री नाईक यांनी महामार्गाशी संबंधित असलेल्या सर्वांना बजावले.
वनांमध्ये व जंगलांमध्ये डेब्रिज,प्लास्टिक याचे प्रमाण सध्या वाढू लागले आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी तालुक्यानिहाय मोहिमा राबवा व वन जंगल स्वच्छ करा त्यासाठी तात्पुरती कंत्राटी मजुरांची तजवीज करण्याच्या आदेश पालकमंत्री नाईक यांनी दिले. महामार्गासह इतर ठिकाणी असलेल्या हॉटेल्स व खाद्यवस्थेची ठिकाणे स्वच्छ आहेत का? सांडपाणी व्यवस्थापन योग्य आहे का? याची पाहणी करा, अस्वच्छ व नागरिकांच्या जीवाशी खेळ करणार्या आस्थापनांना नोटीसी द्या. त्यानंतरही जर ते मानात नसतील तर त्यांचे परवाने रद्द करा असे आदेश पालकमंत्री नाईक यांनी अन्न प्रशासनाला दिले. विविध आस्थापनांच्या बेफिक्रीमुळे फापड पसारा दिसून येतो.
हॉटेल्स समोर असणार्या ओबडधोबड पार्किंग, टायरवाल्यांसमोर टायरचे मांडलेले बस्तान, गोडाऊन समोर सामानांचे प्रस्त आदी ठिकाणी शिस्त लावण्यासाठी नवनियुक्त पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी बैठका घेऊन सर्वांना शिस्तीचे आदेश देण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी केल्या. जिल्ह्यातील संरक्षित वने व काही जंगले परिसरामध्ये फळझाडे लावा या फळझाडांमुळे वन्यजीवांची साखळी अबाधित राहणार आहे. झाडांमुळे शाकाहारी वन्यजीव अधिवास करतील व त्यांच्यावर जगणारे हिंस प्राणी जंगलातच राहतील. त्यामुळे ते शहरांकडे येणार नाहीत म्हणून फळझाडांचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्याचे आदेशही पालकमंत्र्यांनी वनविभागाला व संबंधित अधिकार्यांना व्यासपीठावरून दिले. वाडा मनोर रस्त्याच्या त्रुटीमुळे आजवर हजारो वाहन चालकांसह प्रवाशांना आपले जीव गमवावे लागले आहेत. या जीवांची कोणालाही कदर नाही का असा खरमरीत सवाल पालकमंत्र्यांनी उपस्थित करून प्रशासनाला धारेवर धरले. आठ दिवसात संबंधित अधिकार्यांची बैठक घेऊन उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी यांनी दिल्या.
जिल्ह्यातील कुपोषण कमी असले तरी ते शून्यावर आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे यावेळी पालकमंत्र्यांनी अधोरेखित केले. तर सातपाटी येथील धूप प्रतिबंधक बंधारा पूर्णतः कोलमडून पडल्याने घरांमध्ये समुद्राच्या उधाणाचे पाणी जाऊन घरांचे व घरातील साहित्याचे नुकसान होत असल्याची बाब सातपाटी ग्रामस्थ व आमदार गावित यांनी निदर्शनास आणून दिली. बंधार्याच्या तातडीने दुरुस्ती करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून दहा लाख आणि आमदार गावित यांच्या निधीतून दहा लाखाची तरतूद करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी याचवेळी दिले.