निलेश कासट
कासा: पालघर/नाशिक परिसरातील डोंगराळ भागात उन्हाळ्याच्या दिवसांत नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या करवंदाच्या झुडपांना सध्या मोठा बहर आला आहे. काळसर जांभळ्या रंगाची, गोड-आंबट चवीची करवंदे सध्या ग्रामीण भागातील बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत असून, या रानमेव्याला ग्राहकांचीही चांगली पसंती मिळत आहे. डोंगररांगांमध्ये नैसर्गिकरित्या वाढणाऱ्या करवंदाला स्थानिक भागात “डोंगराची काळी मैना” म्हणूनही ओळखले जाते.
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून करवंद पिकण्यास सुरुवात होते, तर दुसऱ्या आठवड्यात झुडपांवर मोठ्या प्रमाणात फळांचा बहर दिसून येतो. विशेषतः डोंगराळ व जंगल परिसरात करवंदाची झुडपे अधिक प्रमाणात आढळतात. अनेक आदिवासी व ग्रामीण कुटुंबे सकाळी लवकर जंगल परिसरात जाऊन करवंद तोडतात. पळसाच्या पानांमध्ये करवंद भरून स्थानिक बाजारपेठांमध्ये त्यांची विक्री केली जाते. या विक्रीतून अनेकांना हंगामी उत्पन्नाचा आधार मिळतो.
करवंद हे फळ केवळ चवीसाठीच नव्हे तर आयुर्वेदिक गुणधर्मांमुळेही महत्त्वाचे मानले जाते. आयुर्वेदानुसार करवंदामध्ये व्हिटॅमिन ‘सी’, लोह आणि अँटीऑक्सिडंट घटक आढळतात. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणे, पचनक्रिया सुधारण्यास मदत करणे तसेच अशक्तपणा कमी करण्यासाठी करवंद उपयुक्त मानले जाते. कच्च्या करवंदांचा उपयोग लोणचे, ठेचा आणि खारवण तयार करण्यासाठी केला जातो. ग्रामीण भागात पावसाळ्यासाठी करवंदाचे खारवण करून ते साठवून ठेवण्याची परंपरा आजही कायम आहे.
मात्र, वाढती जंगलतोड, डोंगर परिसरातील विकासकामे आणि नैसर्गिक अधिवास नष्ट होत असल्याने करवंदाची झुडपे दिवसेंदिवस कमी होत चालल्याची खंत ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. पूर्वी मोठ्या प्रमाणात दिसणारी करवंदाची झाडे आता निवडक भागांपुरतीच मर्यादित राहिली आहेत. त्यामुळे या रानमेव्याचे संवर्धन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
स्थानिक नागरिकांनी जंगल संवर्धनासोबतच करवंदाच्या झुडपांचे संरक्षण करण्यासाठी शासनाने विशेष मोहिम राबवावी, अशी मागणीही पुढे येत आहे. ग्रामीण संस्कृती, रानमेवा आणि जैवविविधतेचा महत्त्वाचा भाग असलेल्या करवंदाचे अस्तित्व टिकवण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे.