पालघर ः पालघर जिल्हा मुख्यालयातील महत्वाची असलेली शहर नगरपरिषदेसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. भाजप मधून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी पालघर नगरपरिषदेचे माजी गटनेता कैलास म्हात्रे, ऍड जयेश आव्हाड, प्रशांत पाटील इच्छुक आहे.शिंदे सेने कडून माजी उपनगराध्यक्ष उत्तम घरत आणि केदार काळे तर महाविकास आघाडीतुन माजी नगराध्यक्ष उत्तम पिंपळे आणि माजी नगरसेवक ऍड प्रीतम राऊत इच्छुक आहेत.दरम्यान पक्षांतराला उत आला आहे.त्यामुळे निवडणुक रंगात आली आहे. दरम्यान अद्याप उमेदवारी अर्ज दाखल झालेली नाही.
निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पालघर शहरामध्ये शिंदे सेनेला धक्का देत भाजपकडून शहर संघटीका आणि अन्य महिला पदाधिकाऱ्यांना भाजप मध्ये प्रवेश दिल्याने पालघर नगरपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीची होण्याची आशा संपुष्टात आली आहे.सोमवारी रात्री खासदार डॉ हेमंत सवरा यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटाच्या शहर संघटिका सविता मल्लाह आणि अन्य महिला पदाधिकाऱ्यांचा भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्या डहाणू येथिल पक्ष कार्यालयात प्रवेश पार पडला.
पालघर नगर परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका शिल्पा बाजपेयी यांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केला होता. शिल्पा बाजपेयी यांच्या प्रवेशामुळे शिंदे गटाच्या पालघर शहर संघटिका सविता मल्लाह यांना वार्ड क्रमांक 13 मधून उमेदवारी मिळण्याची शक्यता संपुष्टात आली होती. त्यामुळे सविता माल्लाह यांनी भाजपची वाट धरल्याची चर्चा आहे.त्यांच्या सोबत अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
पालघर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची पडताळणी केली जात आहे. अंतिम यादी प्रदेश कार्यालयात पाठवण्यात येणार आहे. प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यता घेतल्यानंतर शनिवार पर्यंत उमेदवारांची नावे घोषित केली जाण्याची शक्यता आहे.