ठळक मुद्दे
दलालामार्फत काही रकमे मार्फत थेट अल्पवयीन मुली विकण्याचा खळबळजनक प्रकार
स्वातंत्र्याच्या ७८ वर्षानंतरही आदिवासींना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार कधी ?
वेठबिगारी मागचे भयाण वास्तव
पालघरः हनिफ शेख
मोखाडा तालुक्यात काही दिवसांपूर्वी तब्बल ६१ वेठबिगारी लोकांना सोडवून आणल्यानंतर त्याठिकाणची विदारक परिस्थिती समोर आली होती. यामध्ये लहान मुलांना मेंढपाळ करणाऱ्या व्यक्तींना विकणे, अल्पवयीन मुलींची लग्न करणे, कोणत्याही आरोग्य सुविधा न देणे अगदी प्रसूती सुद्धा दवाखान्यात न होता राहत असलेल्या एखाद्या पालमध्ये होणे, याशिवाय मारहाण करणे अगदी कमी मोबदला देणे, यातून आजही या भागातील बेरोजगारीची गरिबीची परिस्थिती जगासमोर आली होती मात्र यानंतर आता वाडा तालुक्यातील एक भयाण वास्तव समोर आले यामध्ये दलालामार्फत काही रकमे मार्फत थेट अल्पवयीन मुली विकण्याचा खळबळजनक प्रकार समोर आला.
श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून हा प्रकार समोर आल्यानंतर गुन्हेगारांवर कारवाई झाली मात्र वेठबिगारीमध्ये लहान मुलांना विकणे असो, कि या अल्पवयीन मुलींची विक्री असो हे सर्व प्रकार गरिबी बेरोजगारी अज्ञान यातून होत असल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसून येत आहे. मग शासनाच्या कोटी रुपयांच्या योजना विविध उपक्रम यांचा नेमका फायदा कोणाला होतो याचाच शोध घेणे आता गरजेचे बनले आहे. कारण स्वातंत्र्याच्या ७८ वर्षानंतर सुद्धा येथील आदिवासींना जर माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळणार नसेल तर शासन नेमकं काय करते हा सवाल अनुत्तरीतच राहत आहे.
फिरस्ती जमात
मोखाडा तालुक्यातील तब्बल ६१ वेठबिगारीमध्ये फसलेल्या नागरिकांना काही संस्थांच्या प्रयत्नाने सोडविण्यात यश आले यानंतर या वेठबिगारी मागचे वास्तव किती भयाण आहे याची प्रचिती सर्वांना आली, ही घटना ताजी असतानाच आता वाडा तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून दुसरे भयान वास्तव समोर आले आहे. यामध्ये धुळे, मालेगाव अहिल्यानगर सटाणा अशा जिल्ह्यातील काही विशिष्ट जातींच्या विशेषत: ज्या जमाती फिरस्ती आहेत अशा मधील अनेक मुलांना मुली मिळणे कठीण झाले आहे. मग मुलींसाठी आदिवासी भागात शोध घेण्याचे प्रकार सुरू झाले यातूनच आमच्या मुलाला मुलगी आहे का ? या प्रश्नासह या भागातील काही लोकांच्या ओळखीने मुली शोधल्या जातात.
मुली देण्याचा किंवा विकण्याचा सर्रास प्रकार
घरची गरीबी, मुलींना मासिक पाळी आली म्हणजे तिचं लग्नाचं वय झालं या अज्ञानी मानसिकतेतून मुलगी सज्ञान झाल्याचे ठरविणे, हाताला काम नाही, स्थलांतर व्हावं लागत असल्याने मुलीकडे लक्ष कोण देईल ही भीती, इथेच नातेवाईकात लग्न करायचं म्हणजे लग्नाचा खर्च कोण करील ही विवंचना, याशिवाय मुली पळून जाण्याचे घडत असलेले प्रकार त्यातून वाढलेली पालकांची चिंता अशा अनेक प्रकाराचा फायदा ही लोकं घेताना दिसतात याशिवाय काही रकमेची लालूच सुद्धा दिली जाते त्यातून मग या मुली देण्याचा किंवा विकण्याचा सर्रास प्रकार घडताना आता पालघर जिल्ह्यातील काही तालुक्यात दिसून येत आहे.
या घटनेनंतर वाडा तालुक्यातच १२ मुलींची अशी विक्री झाल्याचे श्रमजीवी संघटनेने सांगितले तर जव्हार शहापूर तालुक्यातील किनवली या तालुक्यांचा सुद्धा यावेळी उल्लेख झाला मात्र हे प्रकार शोधल्यास अनेक तालुक्यात आणि या अशा प्रकारे मुलींची लग्न लावून देण्याचे शेकडो उदाहरणे सापडतील असे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहेत.
तळागळापर्यंत जावून शोधमोहिम गरजेची
ग्रामपंचायत निहाय आणि पाड्या निहाय याबाबत एक शोध मोहीम उघडली गेली तर या घटनांचा शोध घेणे शक्य होणार आहे. यामध्ये शाळाबाह्य मुलांचा प्रामाणिक सर्वे होणे आवश्यक आहे यामधून ज्या मुली शाळेत येत नाहीत त्या कुठे आहेत याचा शोध घेणे सोप्प होईल यानंतर त्या मुलींचं वय तपासून त्या सध्या कुठे आहेत आणि काय करीत आहेत हे सुद्धा जाणून घेता येईल तर दुसरीकडे जॉब कार्ड धारकांची संख्या त्यांनी वर्षभरात केलेले काम जर ते जॉब कार्ड धारक आहेत आणि त्यांनी जर शासनाच्या कामावर काम केलेले नाही तर ते सध्या काय करीत आहेत कुठे काम करत आहेत त्यांचे घर कसे चालत आहे याचा सुद्धा एक सर्वे होणे आवश्यक आहे.