

कसारा : शहापूर तालुक्यातील खैरे गाव हद्दीतील शेणवा येथील आदिवासी कातकरी समाजातील अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने लग्न लावण्याचा कट श्रमजीवी संघटनेने उधळला असून किन्हवली पोलीस ठाण्यात बालविवाह प्रतिबंधक अन्वये दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणात पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींवर गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासादरम्यान उघड झाले की, पिडीत अल्पवयीन मुलीचे वडील दत्तात्रेय विठ्ठल वातेस (वय 50) यांनी आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असल्याने दलाल प्रकाश मुकणे यांच्या मध्यस्थीने मुलीचे लग्न जय लक्ष्मण शिर्के, रा. बाबुलवाडी, ता. पारनेर, जि. अहमदनगर याच्याशी ठरवले होते. या व्यवहारात मुलीच्या बदल्यात पालकांना ५०,००० देण्याचे ठरवून त्यातील १०,००० रुपये रक्कम रोख स्वरूपात एक महिन्यापूर्वी देण्यात आली होती, असे तपासात निष्पन्न झाले आहे.
आरोपी जय लक्ष्मण शिर्के आणि त्याचे वडील लक्ष्मण रघुनाथ शिर्के हे उच्चवर्णीय समाजातील असून त्यांनी पिडीत मुलगी ही अल्पवयीन व अनुसूचित जमातीतील असल्याचे माहित असतानाही तिच्या कुटुंबाच्या गरीबीचा गैरफायदा घेत मुलीची विक्री करून विवाहाचा प्रयत्न केला.
५ ऑक्टोबर २०२५ रोजी लग्नाची तारीख निश्चित करण्यात आली होती, मात्र श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ही खबर मिळताच त्यांनी आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष श्री विवेक भाऊ पंडित यांना ही माहिती देतात त्यांनी दूरध्वनीवरून जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ व पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक नितीन खैरनार यांनी तात्काळ घटनास्थळी किन्हवली पोलिसांचे पथक रवाना केले. पोलिसांनी कारवाई करून अल्पवयीन मुलीचा सौदा करून लग्नाचा प्रयत्न करीत असलेला कट उधळण्यात आला. किन्हवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास उपविभागीय अधीक्षक मिलिंद शिंदे करीत आहेत.
या प्रकरणामुळे आदिवासी कातकरी समाजातील गरीब कुटुंबांना फसवून मुलींची खरेदी-विक्रीसारखी घृणास्पद पद्धत उघड झाली असून अशा प्रकरणांवर कठोर कारवाई करण्याची मागणी श्री विवेक भाऊ पंडित यांनी शासनाकडे केली आहे आदिम आदिवासी अल्पवयीन मुलींच्या विक्री करून जबरदस्तीने लग्न लावण्याच्या या प्रथेविरुद्ध श्रमजीवी संघटनेने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.