

Child Marriage Cases in Palghar
वाडा : मच्छिंद्र आगिवले
वाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत परळी गावातील एका अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार या मुलीचे अवघ्या चौदाव्या वर्षी संगमनेर येथील एका तरुणांसोबत जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आले होते. शहापूर तालुक्यातील किन्हवली भागात असाच प्रकार उजेडात आला असून पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात पन्नास हजारांसाठी अल्पवयीन मुलीची पारनेर तालुक्यातील एका तरुणाशी लग्नगाठ बांधली जाणार होती. लग्नासाठी अल्पवयीन मुलींची केली जाणारी विक्री ही महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना असून मुख्यमंत्र्यांनी याबाबत चौकशीचे आदेश द्यावेत अशी मागणी विवेक पंडित यांनी केली आहे.
परळी गावातील कातकरी समाजातील एका 14 वर्षीय तरुणीचा संगमनेर येथील अन्य जातीतील मुलासोबत जबरदस्तीने विवाह करून देण्यात आला. गावातील एका दलालामार्फत हा विवाह जुळवून देण्यात आला असून आई-वडिलांनी विरोध केल्यावर त्यांना बदनामीची भीती दाखवून गळचेपी करण्यात आली. गर्भवती मुलीची नोंदणी दवाखान्यात करण्यासाठी वय वाढवून बनावट आधारकार्ड देखील बनविण्यात आले मात्र मुलीला जन्म दिल्याने सगळी गणितं बिघडून गेली. चारित्र्यावर संशय घेऊन सतत होणारी मारहाण व उपासमार यामुळे कंटाळून अखेर मुलगी आपल्या गावी आली व सामाजिक कार्यकर्त्यांच्या हस्तक्षेपाने हा प्रकार चव्हाट्यावर आला.
वाडा पोलीस ठाण्यात मुलीच्या फिर्यादीवरून आतापर्यंत सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किन्हवली पोलीस ठाण्यात प्रकाश मुकणे या दलालाच्या मदतीने एका अल्पवयीन मुलीचा बाबुलवाडे (पारनेर), जिल्हा, अहिल्यानगर येथील जय शिर्के नावाच्या व्यक्तीसोबत 5 ऑक्टोबर विवाह ठरविला होता. बदल्यात 50 हजार पीडित मुलीच्या कुटुंबाला देण्यात येणार असून यातील 10 हजारांची रक्कम देण्यात आली आहे. श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हळदीच्या दिवशी यासंदर्भात तक्रार केल्यानंतर महिला व बालविकास विभागाने याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार केली अशी माहिती श्रमजीवी संघटनेच्या प्रवक्त्या चंद्रा जाधव यांनी दिली. नाशिक, नगर व अन्य जिल्ह्यांमध्ये मुलींची होणारी विक्री हा गंभीर प्रकार समोर येत आहे. वाड्यातील बुधावली येथे 4 तर शिलोत्तर व जव्हार तालुक्यात प्रत्येकी 1 अशा विविध गावांमध्ये अशाच घटना घडल्याचा संशय असल्याचे सामाजिक कार्यकर्ते विजय जाधव यांनी सांगितले.
जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाण भीषण असून ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सरकारला अजूनही यश आलेले नाही. अल्पवयीन मुलींचे होणारे बालविवाह हे कुपोषणाचे प्रमुख कारण मानले जात असून बालविवाह प्रतिबंध कायदा आपल्याकडे अस्तित्वात आहे. वाडा तालुक्यात जर अशा प्रकारे अल्पवयीन मुलींची लग्न लावून दिली जात असतील तर बाल प्रतिबंध विवाह कायद्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा काय करते असा सवाल उपस्थित होत आहे. सरकारने गंभीर प्रश्नी दखल घेऊन या सर्व प्रकाराच्या तळाशी जावे अशी मागणी केली जात आहे.
कातकरी ही आदिवासी समाजातील मागासलेली व आदिम जमात समजली जात असून तिचे अस्तित्व आता संकटात सापडले आहे. किरकोळ पैशांसाठी या जातीतील अल्पवयीन मुलींची उच्च समाजात विक्री केल्याच्या घटना समोर येत असून बालविवाह प्रतिबंध कायद्याची ही केवळ पायमल्ली नसून मानवी तस्करी सारखी लज्जास्पद घटना आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी सखोल चौकशी करून बालविकास अधिकारी व अन्य सरकारी यंत्रणेला ऍक्शन मोडवर आणायला हवे.
विवेक पंडित, आदिवासी क्षेत्र आढावा समिती अध्यक्ष.
पालघर व ठाणे जिल्ह्यामधील कातकरी समाजातील दारिद्य्र व शिक्षणाचा अभाव यामुळे अशा अमानवी कृत्यांचा जन्म दुर्दैवाने येथे होत आहे. 12 ते 14 वयोगटातील मुलींची पन्नास हजारांपासून लाख रुपयांना होणारी विक्री हा लाजिरवाणा प्रकार असून बालविवाह प्रतिबंधक कायद्याला काळिमा फासणारा आहे. कायद्याची अंमलबजावणी करणार्या यंत्रणेची सखोल चौकशी करून कारवाईचा बडगा तातडीने उचलावा अन्यथा याविरोधात श्रमजीवी संघटना तीव्र आंदोलन करील.
विजय जाधव, सरचिटणीस ,श्रमजीवी संघटना.