पालघर ः मनोर ग्रामीण रुग्णालयातील प्रसूतीनंतर अधिक उपचारासाठी सिल्वासा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मात्र रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे पत्नीचा मृत्यू झाल्याचा आरोप मृत महिलेच्या पतीने केला असून, संबधीतांवर कारवाईची मागणी केली आहे.
पालघर तालुक्यातील धुकटन गावातील बावीस वर्षीय प्रिती जाधव हिची ग्रामीण रुग्णालयात प्रसूती होऊन बाळ जन्माला आल्यानंतर गर्भ पिशवी बाहेर आल्याने रक्तस्त्राव सुरु झाला होता. गंभीर अवस्थेत सिल्वासा शासकीय रुग्णालयात उपचार असताना तिचा मृत्यू झाला. ग्रामीण रुग्णालयातील रुग्णवाहिका तसेच 108 क्रमांकाची रुग्ण वाहिका उपलब्ध नसल्याने सिल्वासा येथे पोहोचण्यासाठी उशीर झाला. तसेच प्रसूती दरम्यान उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप मयत महिलेच्या पतीने केला असुन कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान आमदार विलास तरे यांनी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेत घटनेची चौकशीसह जबाबदार वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचार्यां विरोधात कारवाईची मागणी केली आहे.
मयत प्रिती जाधव हिला प्रसूती वेदना सुरु झाल्याने रविवारी सकाळी मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.तपासणी दरम्यान गर्भात गुंतागुंत आढळून आल्याने वैद्यकीय अधिकार्यांनी प्रीती ला मनोर मधील स्त्रीरोग तज्ञाकडे सल्ला घेण्यासाठी पाठवले होते.खाजगी रुग्णालयात तपासणी केली असता प्रसूतीसाठी वाट पाहावी लागेल असा सल्ला देत सिझेरियन करण्याचा सल्ला दिला होता. परंतु सिझेरियन प्रसूतीसाठी लागणारे पैसे नसल्याने प्रीतीला घेऊन ग्रामीण रुग्णालयात आणले होते. संध्याकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास प्रीतीची नैसर्गिक प्रसूती झाली,बाळ जन्माला आल्यानंतर काही वेळात वैद्यकीय अधिकार्यांनी प्रीतीची अवस्था गंभीर असल्याचे सांगत उपचारासाठी गुजरात राज्यातील वलसाड येथिल जिल्हा रुग्णालयात नेण्याचा सल्ला प्रीती चा पती राहुल जाधव याला दिला होता.
ग्रामीण रुग्णालयातील रुग्णवाहिका तसेच 108 क्रमांकाची रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध नसल्याने खाजगी रुग्णवहिका मागवण्यात आली. गुजरातच्या दिशेने जात असताना रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन संपल्याने रुग्णवाहिका माघारी आणून ऑक्सीजन सिलेंडर घेऊन मार्गस्थ झाली.वलसाड येथे पोहोचण्यास उशीर होणार असल्यामुळे रुग्णवाहिका सिल्वासा येथील शासकीय रुग्णालयात वळवण्यात आली. दरम्यानच्या काळात रक्तस्त्राव वाढल्याने प्रीतीची अवस्था गंभीर झाली होती.सिल्वासा रुग्णालयात प्रीती ला व्हेंटिलेटरवर टाकून उपचार सुरु करण्यात आले होते.उपचार मिळण्यासाठी उशीर झाल्यामुळे प्रीतीचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला.
आमदारांचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांना पत्र
सप्टेंबर महिन्यात सर्पदंशाच्या रुग्णाला वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला होता.मनोर ग्रामीण रुग्णालयात कार्यरत वैद्यकीय अधिकार्यांकडून सर्वसामान्य रुग्णांवर उपचार करताना निष्काळजीपणा केला जात असल्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांसाठी आशेचे केंद्र असल्याले मनोर ग्रामीण रुग्णालय मृत्यूचे केंद्र बनले आहे. आरोग्य विभागाकडून दरवर्षी कोट्यवधी रुपये निधी मिळत असताना ग्रामीण रुग्णालयात ऑक्सीजन, रुग्णवाहिका,रक्ताचा साठा आणि दर्जेदार प्रसूती सुविधा उपलब्ध नसल्याचा आरोप विलास तरे यांनी आरोग्य मंत्र्यांना दिलेल्या पत्रात केला आहे.
तरुण आदिवासी मातेला तिच्या मूलाला जन्म देताना जिवंत ठेवण्यात राज्याच्या आरोग्य यंत्रणेला अपयश आल्याने घटनेची उच्चस्तरीय चौकशीचे आदेश द्यावे, मनोर ग्रामीण रुग्णालयातील संबधीतांतवर कारवाईची मागणी केली आहे.प्रीती जाधव हिच्या कुटुंबाला 25 लाख रुपयांची आर्थिक मदत आणि मनोर येथील ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्याची मागणी मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे केली आहे.
प्रसूती दरम्यान गर्भपिशवीचा काही भाग बाहेर आल्याने युटेरिय इन्वरजन होऊन रक्तस्त्राव सुरु झाला होता.त्यामुळे स्त्रीरोग तज्ञांनी महिलेला उपचारासाठी सिल्वासा येथे पाठवण्याचा निर्णय घेऊन डॉक्टरांसह सिल्वासा येथे पाठवण्यात आले होते.मनोर ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सर्वतोपरी प्रयत्न केले परंतु सिल्वासा येथील रुग्णालयात उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला.मृत्यूच्या घटनेची वरिष्ठ स्तरावरून चौकशी केली जाईल.डॉ राजगुरू, वैदकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, मनोर
प्रसूती झाल्यानंतर प्रीती गंभीर असल्याचे सांगून वलसाड येथे जाण्यास सांगितले. रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती खाजगी रुग्णवहिकेतुन पोहोचताना उशिर झाल्याने उपचारास उशीर झाला त्यामुळे माझ्या पत्नीचा मृत्यू झाला. जबाबदार लोकांवर कारवाई झाली पाहिजे.राहुल जाधव, धुकटन.