

पाली : शरद निकुंभ
अवघ्या दोन तीन वर्षांपूर्वी रुंदीकरण पूर्ण झालेल्या वाकण पाली खोपोली राज्य महामार्गावर जीवघेणे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांची प्रत्यक्षात खोली मोजून पहिली असता किरकोळ खड्डे वगळता एक फुट खोलीचे 6 तर अर्धा फुट खोलीचे 20 खड्डे पडलेले आहे. या राज्य महामार्गावरून एमएसआरडीसीचे अधिकारी आणि अनेक मंत्री, आमदार, खासदार सतत ये जा करत असतात परंतु अधिकारी करतात डोळेझाक तर लोकप्रतिनिधी शांततेत प्रवास करताय. हा त्रास फक्त सर्वसामान्य जनता सहन करतेय. त्यामुळे प्रवासी व नागरिकांचा संताप आता अनावर झाला आहे.
वाकण-पाली-खोपोली हा राज्यमहामार्ग क्र. 548 (अ) एकूण 39 किलोमीटर लांबीचा आहे. सदर रस्त्याचे काम 2016 पासून शासनाच्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून सुरु करण्यात आले आणि दोन ते तीन वर्षांपूर्वी पूर्ण झाले. मात्र इतके वर्षे काम सुरु असलेल्या या मार्गाच्या कामाच्या दर्जाच्या बाबत अनेकांनी प्रश्न निर्माण केला आहे. शासनाकडून सुमारे 200 कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या या मार्गाच्या दुरावस्थेमुळे प्रवासी व नागरिक संतप्त आहेत.
या मार्गावरील खड्डे योग्य प्रकारे भरण्यासाठी स्थानिकांनी मागील दोन महिन्यात दोन वेळा आंदोलन केले. खड्ड्यामंध्ये झाडे लावून तसेच फलक दाखवून हे आंदोलन करण्यात आले. मात्र अजुनपर्यंत कोणतीच ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. ही उदासीनता नक्की कोणाची असा प्रश्न निर्माण झाला आहे.
रात्रीच्या वेळी वाहन चालकांना लगेच नजरेत न येणार्या या खड्ड्यांनी अनेक दुचाकीस्वरांचे अपघात झाले तर चारचाकी व मोठे वाहने यांचे खड्ड्यात गाडीचे चाक आदळून मोठे नुकसान होत आहे. यावेळी मनस्ताप झालेल्या चालकांकडून शिव्यांची लाखोळी अधिकार्यांना वाहिली जाते. गेल्या तीन वर्षात सिमेंटच्या रस्त्यांचे सुरवात आणि शेवट सुद्धा एमएसआरडीसी च्या अधिकार्यांना व्यवस्थित जोडता आलेला नाही.
आंधळा दळतोय कुत्रं पीठ खातोय या उक्तीप्रमाने सध्या एमएसआरडीसी चे काम सुरू आहे. या मार्गावर पाली मिनिडोअर स्थानक, देवन्हावे, मिरकुटवाडी, इमॅजिका, उंबरे, गोंदाव फाटा, दुधाने वाडी, वर्हाड, रासळ, पाली, बलाप व राबगाव या गावांजवळ खड्डे पडले आहेत. आहे. तसेच इतर ठिकाणी देखील कमी अधिक प्रमाणात खड्डे आहेत. यामुळे येथे वारंवार अपघात होत आहेत. या मार्गावर मोठ्या प्रमाणात अपघाताची मालीका सुरूच आहे, त्यात अनेक निष्पापांचा बळी जात आहे. तर काहीना अपंगत्व आले आहे.
वाकण ते पाली फाटा या रस्त्याचे काम बघणारे एमएसआरडीसीचे अधिकारी सारंग इनामदार यांना संपर्क साधला असता त्यांनी पावसाचे कारण देऊन वेळ मारून नेली. ही जीवघेणे खड्डे तात्पुरते भरण्यासाठी एमएसआरडीसी कडे कोणतीही यंत्रणा नाही का ? पावसाळ्यातच ही जीवघेणी खड्डे जास्त प्रमाणात अपघाताला निमंत्रण देत आहेत, ही साधी गोष्ट अधिकार्यांना कळत नाही का ? असे अनेक प्रश्न निर्माण होतात परंतु याची उत्तरे कोण देईल असे जनतेच्या मनात आहेत.
लोकप्रतिनिधी, तहसीलदार यांना जनतेच्या वतीने विनंती आहे की एमएसआरडीसी चे अधिकारी यांची तहसील कार्यालयात एक मीटिंग आयोजित करावी म्हणजे काहीतरी ठोस पर्याय यावर निघू शकेल, अन्यथा खड्ड्यांच्या कारणास्तव जर अपघात झाला तर याला पूर्णपणे प्रशासन आणि एमएसआरडीसीचे अधिकारीचे अधिकारी यांना जबाबदार धरून गुन्हे दाखल केल्याशिवाय गत्यंतर राहणार नाही असा संताप नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
या मार्गावरील खड्डे इतके मोठे व खोल आहेत की या खड्ड्यात दुचाकी व चारचाकी वाहने आदळून अपघात तर होत आहेतच त्याशिवाय वाहनांचे टायर फुटले तर चाकांचे रिंग दबल्या आहेत. त्यामुळे प्रवासी व वाहन चालक यांना नुकसान सोसावे लागत आहे.
वेत्रवान गुरव, स्थानिक नागरिक