Palghar Liquor Licenses Pudhari
पालघर

Palghar Liquor Licenses: ‘बाटली आडवी‌’ अशक्यच! पालघरमध्ये महिलांच्या नावावरच मद्यविक्री परवाने का?

दारूबंदीची लढाई लढणाऱ्या महिलांच्याच नावावर परवाने; ‘मंगळसूत्राची दुश्मन मंगळसूत्र?’ असा सवाल

पुढारी वृत्तसेवा

बोईसर : संदीप जाधव

ग्रामीण तसेच शहरी भागात दारूविक्रीविरोधात सर्वाधिक आक्रमक भूमिका महिलांचीच असते. गावागावांत महिलांनी दारूबंदीची आंदोलने उभी केली, दारू दुकाने बंद पाडली, अशी अनेक उदाहरणे आहेत. मात्र याच पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यात तब्बल 339 मद्यविक्री परवाने महिलांच्या नावावर असल्याची माहिती समोर आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे दारूला विरोध करणाऱ्या महिलाच जर दारू विक्रीच्या परवान्यांच्या मालकीण बनत असतील, तर “मंगळसूत्राची दुश्मन मंगळसूत्र ठरत आहे का?” असा सवाल आता समाजात उपस्थित होत आहे.

पालघर जिल्ह्यात सध्या एकूण 1,485 मद्यविक्री परवाने आहेत. त्यापैकी 1,137 परवाने पुरुषांच्या नावावर असून तब्बल 339 परवाने महिलांच्या नावावर असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आकडेवारीतून समोर आली आहे. विशेष म्हणजे मागील पाच वर्षांतच 59 महिलांना नव्याने मद्यविक्री परवाने देण्यात आले आहेत. ग्रामीण भागात दारूमुळे होणारे कौटुंबिक वाद, आर्थिक संकटे आणि सामाजिक समस्या यामुळे महिलांनी अनेकदा दारूबंदीची चळवळ उभी केली आहे. गावसभांमध्ये दारूविक्रीविरोधी ठराव घेतले जातात, दारूची दुकाने बंद करण्यासाठी महिलांनी मोर्चे काढलेली उदाहरणेही आहेत.

अशा परिस्थितीत महिलांच्या नावावरच मद्यविक्री परवाने घेतले जात असल्याने सामाजिक पातळीवर चर्चा रंगू लागली आहे. प्रत्यक्षात या परवान्यांमागील व्यवहार वेगळाच असल्याचे निरीक्षणातून दिसून येते. कागदोपत्री परवाना महिलांच्या नावावर असला, तरी व्यवसायाचा कारभार प्रामुख्याने पुरुषांकडेच असल्याचे स्थानिक स्तरावर सांगितले जाते. वारसा हक्क, कुटुंबातील सोयीसुविधा किंवा व्यावसायिक कारणे यामुळे पत्नी किंवा कुटुंबातील महिलांच्या नावावर परवाने घेतले जात असल्याची बाब पुढे येत आहे. त्यामुळे प्रशासनाने मद्यविक्री परवान्यांच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याबरोबरच सामाजिक परिणामांचाही गांभीर्याने विचार करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

उद्ध्वस्त होणाऱ्या कुटुंबांचे दु:ख कोण मांडणार?

जिल्ह्यात बीअर बार, देशी दारू दुकाने, वाईन शॉप तसेच हॉटेल बारमध्ये मद्यविक्रीसाठी विविध प्रकारचे परवाने देण्यात आले आहेत. ग्रामीण तसेच शहरी भागात या परवानाधारकांची संख्या वाढताना दिसत आहे. मात्र समाजजीवनावर दारूच्या दुष्परिणामांविरोधात आवाज उठवणाऱ्या महिलांच्या नावावरच दारूविक्रीची दुकाने उभी राहत असतील, तर दारूमुळे उध्वस्त होणाऱ्या कुटुंबांचे दु:ख कोण मांडणार? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT