अप्पर तहसील कार्यालय Pudhari
पालघर

Palghar News | कासा तालुक्याची मागणी पुन्हा चर्चेत; नव्या अपर तहसीलदार कार्यालयामुळे विभाजनाला गती मिळणार?

अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्याबाबत हरकती व सूचना मागविणारे परिपत्रक प्रसिद्ध केल्याने कासा तालुक्याच्या निर्मितीची चर्चा पुन्हा रंगली

पुढारी वृत्तसेवा

Palghar Administrative Division

निलेश कासट

पुढारी वृत्तसेवा : पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या आणि भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण असलेल्या डहाणू तालुक्याच्या प्रशासकीय विभाजनाची प्रक्रिया आता वेग घेण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. डहाणू विभागाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी कासा येथे नवीन अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्याबाबत हरकती व सूचना मागविणारे परिपत्रक प्रसिद्ध केल्याने कासा तालुक्याच्या निर्मितीची चर्चा पुन्हा रंगली आहे.

डहाणू तालुक्यातील कासा हे मध्यवर्ती ठिकाण असून ते परिसरातील सुमारे ३४ हून अधिक गावांसाठी मुख्य बाजारपेठ आणि प्रशासकीय दळणवळणाचे केंद्र म्हणून ओळखले जाते. कासा परिसराला डहाणू, तलासरी, जव्हार आणि विक्रमगड या चार तालुक्यांचा संपर्क लाभला असून मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत असल्याने या भागाचे भौगोलिक आणि आर्थिक महत्त्व अधिक वाढले आहे.

वाढती लोकसंख्या, विस्तीर्ण कार्यक्षेत्र आणि दुर्गम भागातील नागरिकांना प्रशासकीय कामांसाठी करावा लागणारा प्रवास लक्षात घेता डहाणू तालुक्याच्या विभाजनाची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. विशेषतः किरमिरा, किनव्हलीसह दादरा आणि नगर हवेली सीमेलगतच्या गावांतील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि आर्थिक खर्चही मोठ्या प्रमाणात वाढतो.

प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या प्रस्तावानुसार कासा, चारोटी आणि सायवन या महसूल मंडळांतील अनेक गावे नव्या अपर तहसीलदार कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट करण्यात येणार आहेत. यासाठी नागरिकांकडून हरकती आणि सूचना ७ जुलै पर्यंत मागविण्यात आल्या असून अंतिम निर्णयानंतर या कार्यालयाच्या स्थापनेचा मार्ग मोकळा होणार आहे.

दरम्यान, कासा येथे स्वतंत्र तालुक्याची निर्मिती झाल्यास डहाणू तालुक्याच्या पूर्वेकडील ग्रामीण व आदिवासीबहुल भागाला विकासाची नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. प्रशासकीय सेवा नागरिकांच्या अधिक जवळ पोहोचण्याबरोबरच महसूल, आरोग्य, शिक्षण, कृषी आणि पायाभूत सुविधांच्या विकासालाही चालना मिळू शकते. त्यामुळे कासा तालुक्याच्या मागणीला पुन्हा एकदा बळ मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT