Palghar Crime : मिरा-भाईंदर, वसईमध्ये १५ महिन्यात ५७ हत्या

मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय हद्दीत गुन्हेगारीचा वाढता आलेख
Palghar Crime News
Palghar Crime Newspudhari photo
Published on
Updated on

विरार : चेतन इंगळे

मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वेगाने शहरीकरण होत असलेला आणि लाखो नागरिकांचे निवासस्थान बनलेला हा परिसर आज विकासाबरोबरच गुन्हेगारीच्या वाढत्या आव्हानांनाही सामोरा जात आहे. हत्या, खुनाचा प्रयत्न, महिलांवरील अत्याचार, सायबर फसवणूक, अमली पदार्थांची तस्करी, घरफोडी, चोरी आणि संघटित गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

उपलब्ध अधिकृत आकडेवारीनुसार, २०२५ या वर्षात मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एकूण ६,६२५ गुन्ह्यांची नोंद झाली. त्यापैकी ५,९३५ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये शोधदर चांगला असला तरी गुन्ह्यांची वाढती संख्या चिंतेचा विषय ठरत आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सातत्याने प्रयत्न करत असली तरी वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत निर्माण होणारी नवी आव्हाने अधिक गुंतागुंतीची होत चालली आहेत.

Palghar Crime News
Thane crime rate: ठाणे स्मार्ट सिटी की क्राईम सिटी? एका महिन्यात 1100 हून अधिक गुन्हे

हत्या प्रकरणांची आकडेवारी विशेषतः धक्कादायक आहे. गेल्या १५ महिन्यांत आयुक्तालय हद्दीत ५७ हत्या झाल्या असून त्यापैकी तब्बल ४५ हत्या वसई-विरार परिसरात घडल्या आहेत. कौटुंबिक कलह, मालमत्तेचे वाद, आर्थिक व्यवहार, प्रेमसंबंधातील तणाव, जुने वैमनस्य आणि क्षुल्लक कारणांवरून उद्भवलेल्या भांडणांचे रूपांतर थेट हत्यांमध्ये होत असल्याचे तपासातून समोर आले आहे. समाजातील वाढती असहिष्णुता आणि क्षणिक रागातून घडणाऱ्या गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असल्याची बाब या घटनांतून अधोरेखित होत आहे.

वसई, विरार आणि नालासोपारा या शहरांचा गेल्या दोन दशकांत अभूतपूर्व विस्तार झाला आहे. परवडणारी घरे, मुंबईशी असलेली रेल्वे जोडणी आणि रोजगाराच्या संधी यामुळे लाखो नागरिक या भागात स्थायिक झाले. मात्र वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत नागरी सुविधा, वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षा यंत्रणांवर मोठा ताण निर्माण झाला आहे. अनेक भागांमध्ये वाढती गर्दी, दाट लोकवस्ती आणि अपुरी देखरेख यामुळे गुन्हेगारांना वाव मिळत असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत.

महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये झालेली वाढ प्रशासनासाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार २०२३ मध्ये आयुक्तालय हद्दीत ३६० बलात्कार प्रकरणे नोंदविण्यात आली होती. २०२४ मध्ये हा आकडा वाढून ४०७ वर पोहोचला. त्यानंतर २०२५ मध्ये बलात्काराच्या ४६६ घटना नोंदविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. म्हणजेच केवळ दोन वर्षांत या गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे विनयभंगाच्या घटनांमध्येही वाढ झाली असून २०२३ मधील ४७७ प्रकरणे २०२४ मध्ये ५५५ वर पोहोचली. या आकडेवारीमुळे महिला सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनल्याचे स्पष्ट होत आहे.

Palghar Crime News
Munna Jhingada: मुंबईचा कुख्यात गुंड ते ISI चा दहशतवादी? मुन्ना झिंगाडाचा गुन्हेगारी विश्वातील प्रदीर्घ प्रवास

अनेक प्रकरणांमध्ये विवाहाचे आमिष, सामाजिक माध्यमांवरील ओळख, ओळखीच्या व्यक्तींकडून फसवणूक, कौटुंबिक दबाव आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचार अशा बाबी समोर येत आहेत. महिला सुरक्षा पथके, ‘दमिनी’ पथक आणि विविध जनजागृती मोहिमा राबविल्या जात असल्या तरी वाढती आकडेवारी प्रशासनासाठी चिंतेची बाब ठरत आहे.दरम्यान, सायबर गुन्ह्यांचे संकट झपाट्याने वाढत आहे. ऑनलाइन गुंतवणुकीचे आमिष दाखवून फसवणूक, बनावट नोकरीच्या जाहिराती, कर्ज अॅप्स, बँक खात्यांची माहिती चोरणे, सामाजिक माध्यमांद्वारे ब्लॅकमेलिंग आणि बनावट संकेतस्थळांच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक अशा गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे.

आकडे बोलतात

  • उकल झालेले गुन्हे : ५,९३५

  • गेल्या १५ महिन्यांतील हत्या : ५७

  • वसई-विरार परिसरातील हत्या : ४५

  • बलात्कार प्रकरणे (२०२३) : ३६०

  • बलात्कार प्रकरणे (२०२४) : ४०७

  • बलात्कार प्रकरणे (२०२५) : ४६६

  • विनयभंग प्रकरणे (२०२३) : ४७७

  • विनयभंग प्रकरणे (२०२४) : ५५५

  • विशेष कायद्यांअंतर्गत गुन्हे : ३,६१७

  • उकल झालेली प्रकरणे : ३,५९४

गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत. अमली पदार्थ, संघटित गुन्हेगारी आणि सायबर गुन्ह्यांविरोधात सातत्याने कारवाई केली जात असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.

मिरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय

महिलांवरील अत्याचार आणि सायबर फसवणुकीच्या घटना वाढत आहेत. सुरक्षित परिसरासाठी प्रशासन, पोलीस आणि नागरिकांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे.

आशा तिवारी, समाजसेवक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news