Kasa police station woman assault
कासा: पालघर जिल्ह्यात महिलांच्या सुरक्षिततेला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. कासा पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावलेल्या महिलेवर हवालदाराकडून लैंगिक अत्याचार झाल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. या घटनेमुळे पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेविरोधात दाखल असलेल्या कौटुंबिक वादाच्या तक्रारीसंदर्भात तिला कासा पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगण्यात आले होते. चौकशीच्या नावाखाली महिलेचा जबाब घेण्यासाठी तिला बोलावण्यात आले, मात्र यावेळी आरोपी हवालदाराने आपला अधिकाराचा गैरवापर करत तिला पोलीस कॉलनीतील एका एकांत स्थळी नेले. तेथेच तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे आरोपपत्रात नमूद आहे.
घटनेची माहिती बाहेर येताच पालघर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी तत्परता दाखवत डहाणू पोलीस ठाण्यात शून्य क्रमांकाने गुन्हा नोंदवला. आरोपी हवालदार शरद बोगाडे याच्याविरुद्ध लैंगिक अत्याचारासह बलात्कार, धमकी आणि पदाचा गैरवापर या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास कासा पोलीस ठाण्याकडे हस्तांतरित करण्यात आला आहे.
कासा पोलिस व स्थानिक गुन्हे शाखे कडून आरोपी हवालदाराला ताब्यात घेतले असून प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पोलीस ठाण्यातच सुरक्षित नसल्यास सामान्य महिलांनी कुठे जायचे? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. मात्र या गंभीर घटनेचे गांभीर्याने दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी कासा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक यांची तातडीने बदली केल्याचे समजते.
या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आरोपी हवालदाराविरुद्ध कडक शिस्तभंगाची कारवाई होणार असल्याचे संकेत दिले आहेत. पुढील चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नियुक्त करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.