जव्हार ः जव्हार ते सिल्वासा गोरठण फाटा ते वडोली रातोनाफाटा हा प्रमुख रस्ता सध्या अक्षरशः खड्डेमय झाला असून रस्त्याची अगदी चाळण झाली आहे, यामुळे नागरिक, शाळकरी मुले, रुग्ण आणि वाहनचालक यांचे हाल सुरू आहेत. एकेकाळी गुळगुळीत आणि सुस्थितीत असलेला हा डांबरी रस्ता आता मोठमोठ्या खड्ड्यांनी व्यापला असून रस्त्याचे स्वरूप ‘खड्डे आणि थोडासा रस्ता’ असे झाले आहे.
या रस्त्याची दयनीय अवस्था पाहता नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गोरठण, वडोली, रातोनाफाटा तसेच आसपासच्या गावांतील नागरिक दररोज या मार्गावरून सेलवास, जव्हार, मोखाडा व इतर ठिकाणी प्रवास करतात. मात्र, पावसाळ्यानंतर रस्त्यावरील डांबर उखडून निघालं आहे, यामुळे प्रवासी वाहतूकदारांना गाडीची आदळ आपट करीत भल्यामोठ्या खाड्यातून रस्ता काढण्याची वेळ वाहन चालकांवर आली आहे.
जव्हार सिल्वासा हा मुख्य राज्यमार्गाची चाळण झाल्याने, प्रवाशांना व मुख्यतःहा गरोदर , आजारी रुग्णांना तारेवरची कसरत करीत तालुक्याचे ठिकाण गाठावे लागत आहे, ह्या मुख्य रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांना रस्ता ओळखणे कठीण झाले असून अनेकदा वाहनांची मोडतोड होते.
अपघाताचा धोका वाढल्याने प्रवास करणे धोकादायक ठरत आहे. या रस्त्यावरून दररोज एस.टी. बस, खासगी वाहने, दोनचाकी तसेच रुग्णवाहिका सुद्धा ये-जा करतात. रुग्णांना दवाखान्यात पोहोचवताना चालकांना अक्षरशः जीव मुठीत धरावा लागतो. शाळकरी मुलांना शाळेत येताना आणि घरी परतताना सतत भीती वाटते. काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला खोल खड्डे निर्माण झाले असून थोडीशी चूक झाली तरी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.
सिल्वासा गुजरात रस्त्यावर पडलेल्या भल्यामोठ्या खड्ड्यांमुळे अनेक दुचाकीस्वारांचे खेड्यात आदळून अपघात घडले आहेत, काही नागरिकांनी स्वतःहून खडी टाकून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला, पण काही दिवसांतच ती खडी वाहून गेल्याने परिस्थिती पूर्ववत झाली आहे.
या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सांगितले असता, हा सिल्वासा गुजरात राज्याला जोडणारा रस्ता असल्यामुळे ह्या रस्त्याकडे राज्यमहामार्गाकडे असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सांगत आहेत. यामुळे येथील गोरगरीब अशिक्षित ग्रामस्थ कोणाकडे विचारपूस करणार हाच मुद्दा आहे. राज्यमार्गाने या रस्त्याकडे वेळीच लक्ष घालावे अशी मागणी केली आहे.
नागरिकांचा ठाम निर्धार “रस्ता दुरुस्त झाला नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरणार!” या गंभीर समस्येकडे शासन आणि प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, हीच स्थानिक नागरिकांची एकमुखी मागणी आहे. नाहीतर आंदोलन करू असे ह्या भागातील ग्रामस्थ बोलत आहेत.
स्थानिक नागरिक यांनी सांगितले की, “हा रस्ता आमच्यासाठी रोजचा त्रास बनला आहे. पावसात खड्ड्यांत पाणी साचल्यामुळे वाहनांना मोठ्या अडचणी येतात. अनेकदा अपघाताच्या घटना घडल्या आहेत, पण प्रशासन मात्र डोळेझाक करत आहे. जर या रस्त्याची दुरुस्ती तातडीने करण्यात आली नाही, तर आम्ही सर्व नागरिकांना घेऊन रास्ता बंद आंदोलन छेडू,” असा इशारा त्यांनी दिला.गोविंद गावीत, गोरठण रहिवासी.