समुद्रात अवैध मासेमारी, ट्रॉलर घुसखोरीवर ड्रोन टेहळणीद्वारे नियंत्रण pudhari photo
पालघर

Palghar illegal fishing : समुद्रात अवैध मासेमारी, ट्रॉलर घुसखोरीवर ड्रोन टेहळणीद्वारे नियंत्रण

ट्रॉलर, पर्ससीन, एलईडी पद्धतीच्या मासेमारीला काहीसा आळा बसला

पुढारी वृत्तसेवा

पालघर : समुद्रात ट्रॉलर, पर्ससीन व एलईडी पद्धतीची मासेमारी पारंपारिक मासेमारीला मारक ठरत असून यावर नियंत्रण ठेवण्यासाठी समुद्रात ड्रोनद्वारे टेहळणी करण्यात येत असल्याने ट्रॉलर, पर्ससीन, एलईडी पद्धतीच्या मासेमारीला काहीसा आळा बसला आहे. पालघर जिल्ह्यात सागरी क्षेत्रात अवैद्य पद्धतीने मासेमारी होणार नाही यासाठी तीन ठिकाणी नियमितपणे 12 समुद्रात मैलापर्यंत ड्रोनद्वारे टेहळणी केली जाते.

महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 (सुधारणा 2021) अंतर्गत कायद्याच्या अंमलबजावणीसाठी तसेच सागरी सुरक्षेसाठी ड्रोनद्वारे समुद्रात टेहळणी करण्यास 9 जानेवारी 2025 पासून पालघर जिल्ह्यात प्रारंभ झाला. पालघर जिल्ह्यातील झाई, शिरगांव व रानगाव येथून ड्रोन ऑपेरेशन होते. प्रत्येक ठिकाणी कार्यरत असणारे हे टेहळणी ड्रोन 120 मीटर उंचीवरून 25 किमीचा परीघ पूर्ण करतो. किनाऱ्यापासून 12 सागरी मैल अंतरावर टेहळणी करणाऱ्या ड्रोनची बॅटरी दोन तास चालते. या ड्रोनचे सर्वसाधारणपणे दिवसातून तीन वेळा उड्डाण केले जातात. ड्रोनवरील छायाचित्र हे मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयात असलेल्या नियंत्रण कक्षामध्ये ऑनलाइन पद्धतीने दिसून येते.

या टेहळणी दरम्यान काही संशयास्पद दिसल्यास नियंत्रण कक्ष संबंधित जिल्ह्यांच्या सहआयुक्त कार्यालयांना सूचना देण्याचे काम करत असून गस्ती नौकेद्वारे संबंधित ठिकाणी पोहोचून आवश्यकती कारवाई करण्यात येते. याशिवाय नवमित्र या मोबाईल ॲप्लिकेशन द्वारे मत्स्य व्यवसाय विभागाच्या कर्मचाऱ्यांना देखील ड्रोन टेहळणीचा तपशील उपलब्ध असतो. पालघर जिल्ह्यात सागरी क्षेत्रात करण्यात येणाऱ्या या ड्रोन टेहळणीद्वारे नौकांचा कलर कोड, मासेमारी प्रकार, निषिद्ध क्षेत्रात एलईडी, ट्रॉलर किंवा परसीन मासेमारी, समुद्रात काही संशयास्पद हालचाली घडल्या तर वाहून गेलेला कंटेनर इत्यादी शोधण्यास मदत होते.

जानेवारी 2025 पासून नोंदवली 121 संशयास्पद प्रकरण

जानेवारी 2025 पासून सुरू करण्यात आलेल्या ड्रोन द्वारे टेहळणी करण्याच्या प्रक्रियेत 121 संशयास्पद प्रकरण नोंदवण्यात आली. 99 प्रकरणांमध्ये निर्णय घेण्यात आला असून 22 प्रकरणे अजूनही निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत आहेत. ड्रोन टेहळणी ही वेगवेगळ्या वेळेत होत असल्याने 12 सागरी मैलच्या मधील भागात ट्रॉलर व इतर अवैद्य पद्धतीच्या मासेमारी बोटीची होणाऱ्या घुसखोरीला आळा बसण्यास मदत होत असल्याचे मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांचे व मच्छीमारांचे म्हणणे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT