पालघर शहर : गळा चिरून मुलाने वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना पालघर पूर्वेकडील रामनगर परिसरात घडला आहे. मोहनलाल परमार (५५) असे मृतकाचे नाव असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
पालघर शहराच्या पूर्वेकडील रामनगर परिसरात या ओरियन ग्रँड ही इमारत आहे.या इमारतीत मोहनलाल परमार त्यांचा मुलगा मुकेश परमारसोबत वास्तव्यास होते. चार दिवसांपूर्वी मोहनलाल परमार यांची पत्नी गावी गेल्याने घरात फक्त वडील आणि मुलगा असे दोघेच राहत होते. मोहनलाल परमार यांच्या धाकट्या मुलाने त्यांना अनेक वेळा फोन केला, पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर धाकट्या मुलाने त्याच्या एका मित्राला वडिलांच्या घरी पाठवले.
या मित्राने घरात जाऊन पाहिले असता मोहनलाल परमार यांचा मृतदेह आढळून आला, त्यानंतर तातडीने याबाबतची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. रविवारी दुपारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पालघर पोलीस घटनास्थळी दाखल आणि पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. पालघर पोलिसांनी तातडीने कारवाई करत तांत्रिक माहिती आणि इतर पुराव्यांच्या आधारे घटनेच्या एका तासाच्या आत गुजरात राज्यातील भरूच येथून मुकेश परमार याला अटक केली.
दरम्यान आर्थिक वादातून मुलाने वडिलांची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र पोलीस आता हत्येमागील नेमका हेतू, आर्थिक वाद आणि घटनेच्या इतर पैलूंचा अधिक तपास पालघर पोलीस करीत आहेत.