Bapugaon mass funeral
कासा : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील धानिवरी येथे सोमवारी झालेल्या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या १२ जणांवर मंगळवारी (दि.१९) बापुगाव येथे सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच रांगेत सर्व मृतदेह ठेवून अंत्यसंस्कार करण्यात आल्याने उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू अनावर झाले. या हृदयद्रावक घटनेमुळे बापुगावसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
अपघातातील मृतांमध्ये एकाच कुटुंबातील सदस्यांचाही समावेश असल्याने अनेक कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. एका पतीने आपल्या मुलीचा व पत्नीचा मृत्यू उघड्या डोळ्यांनी पाहिल्याची वेदनादायी घटना उपस्थितांना हेलावून टाकणारी ठरली. अंत्यसंस्कारावेळी नातेवाईकांचा आक्रोश आणि गावकऱ्यांचे अश्रू पाहून वातावरण अत्यंत भावनिक झाले होते.
या सामूहिक अंत्यसंस्कारासाठी राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके , पालघरचे खासदार हेमंत सवरा यांच्यासह जिल्ह्यातील विविध आमदार व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करत शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा विश्वास दिला.
अपघातातील १७ जखमींवर सध्या डहाणू तालुक्यातील धुंदलवाडी येथील वेदांता रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचारादरम्यान कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आदिवासी विकास विभागाने जखमींचे पालकत्व स्वीकारल्याची माहिती मंत्री अशोक उईके यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील तातडीने मदत जाहीर केल्याचे त्यांनी सांगितले.
जखमींच्या नातेवाईकांसाठी रुग्णालय ते गाव प्रवासाची तसेच राहण्याची संपूर्ण व्यवस्था आदिवासी विकास विभागाकडून करण्यात येत आहे. कोणालाही वाऱ्यावर सोडले जाणार नाही.- मंत्री उईके