

Mumbai Ahmedabad Highway Accident
पालघर: शासन जखमींच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. जखमी पूर्णपणे बरे होईपर्यंत त्यांच्या उपचारांची संपूर्ण जबाबदारी शासन घेईल, तसेच अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आल्याची माहिती वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिली.
यावेळी खासदार डॉ. हेमंत सवरा, जिल्हाधिकारी मनोज रानडे, जिल्हा पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रामदास मराड तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धानीवरी गावाच्या हद्दीतील गेटीपाडा येथे झालेल्या अपघातानंतर प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू करत जखमींना वेळीच उपचार उपलब्ध करून दिला. अपघाताची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, पोलीस, आरोग्य विभाग आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य युद्धपातळीवर राबविले.
या पार्श्वभूमीवर वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री नाईक यांनी वेदांत हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या जखमींची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांनी डॉक्टर आणि प्रशासनाकडून उपचार व्यवस्थेची माहिती घेत जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिल्या.