Palghar Fatal Accident | साखरपुड्यासाठी निघालेल्या वऱ्हाडाच्या ट्रकचा भीषण अपघात ; 13 ठार, 30 हून अधिक गंभीर जखमी

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर धनिवरी येथे आयशर ट्रक आणि कंटेनरची जोरदार धडक ; मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Palghar Fatal Accident
Palghar Fatal Accident
Published on
Updated on

कासा : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील धनिवरी येथे साखरपुड्यासाठी निघालेल्या वऱ्हाडांच्या आयशर ट्रकचा भीषण अपघात झाला. आयशर ट्रक आणि भरधाव कंटेनर यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत दोन्ही वाहने जागीच पलटी झाली. या भीषण अपघातात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला असून 30 पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डहाणू तालुक्यातील बापू गाव खडकीपाडा येथील बाळाराम जयराम दांडेकर या नवऱ्या मुलाचा साखरपुडा डहाणू तालुक्यातील धनिवरी येथे आयोजित करण्यात आला होता. साखरपुड्यासाठी वराडी आयशर ट्रकमधून निघाले होते. ट्रकमध्ये 100 पेक्षा अधिक वराडी असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, धानिवरी उड्डाणपुलाजवळील सर्विस रोडवरून आयशर ट्रक मुंबई वाहिनीवर विरुद्ध दिशेने जात असताना हा भीषण अपघात घडला. ट्रक उजव्या बाजूच्या अंतर्गत रस्त्याकडे वळणार असतानाच भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनर चालकाचा ताबा सुटला आणि कंटेनरने आयशर ट्रकला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहने जागेवरच पलटी झाली. या अपघातात एका दुचाकीस्वाराचाही मृत्यू झाला आहे.

Palghar Fatal Accident
Palghar Fatal Accident

अपघातानंतर घटनास्थळी एकच आक्रोश पसरला होता. स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू करत जखमींना बाहेर काढले. सुरुवातीला सर्व जखमींना कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने काही जखमींना धुंदलवाडी येथील वेदांता रुग्णालयात तर काहींना पुढील उपचारासाठी वापी येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

आयशर टेम्पो (क्रमांक MH 48 DC 7474) मुंबई-गुजरात मार्गावर चुकीच्या दिशेने जात होता. गावाजवळ पोहोचल्यावर समोरून येणाऱ्या ट्रेलरने ( क्रमांक NL 01 AC 9118) नियंत्रण गमावले. तसेच एक मोटारसायकल (क्रमांक MH 04 EM 8425) देखील या अपघातात सापडली.

मृत व्यक्तींची नावे पुढीलप्रमाणे आहेत :

1. सुरेश रत्ना लाखात

2. पांडू गणपत लाखात

3. काळू गोविंद लाखात

4. सुनील अर्जुन दांडेकर

5. चिमा गोविंद कुरहाडा

6. नमिता विठ्ठल दांडेकर

7. सारिका संतोष लाखात

8. आयुष सिताराम लाखात

9. सागर नामदेव शेंडे

10. वंदना शिवराम वळवी

11. सलोनी शिवराम वळवी

12. अजय अहाडी

13. रियांशी संतोष लाखात

जिल्हा प्रशासन व स्थानिक पोलीस यंत्रणा घटनास्थळी उपस्थित असून मदतकार्य तसेच महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी समन्वय साधत आहेत. या अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू असल्याचे पालघर जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तपासातील पुढील माहिती तसेच जखमींच्या प्रकृतीबाबतची अद्ययावत माहिती वेळोवेळी देण्यात येईल. अधिक माहितीसाठी अथवा संबंधित माहिती देण्यासाठी नातेवाईकांनी डॉ. सचिन वाघमारे यांच्याशी ९४२१४८५५०४ या क्रमांकावर संपर्क साधावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news