Dahanu Ranshet ZP School
डहाणू : डहाणू तालुक्यातील निकणे केंद्रांतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रानशेत (पाटीलपाडा) येथील समग्र शिक्षा अभियानाच्या निधीच्या आर्थिक व्यवहारावरून वाद निर्माण झाला आहे. शाळेसाठी शैक्षणिक साहित्य, स्वच्छता साहित्य, विद्युत फिटिंग तसेच रंगरंगोटी आदी कामांसाठी मंजूर झालेला निधी शाळेचे मुख्याध्यापक कुशाल राठोड यांनी शाळा व्यवस्थापन समितीच्या ठरावाच्या आधारे स्वतःच्या बँक खात्यात वर्ग केल्याचा गंभीर आरोप शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्यांनी केला आहे. या प्रकरणामुळे शैक्षणिक वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, पंचायत समिती प्रशासनाने चौकशीचे आदेश देण्याची भूमिका घेतली आहे.
रानशेत (पाटीलपाडा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत वर्ग असून, शाळेची विद्यार्थी पटसंख्या १०० पेक्षा अधिक आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये समग्र शिक्षा अभियानांतर्गत शाळेला विविध शैक्षणिक व भौतिक सुविधांसाठी निधी उपलब्ध झाला होता. या निधीतून आवश्यक साहित्य खरेदी आणि शाळेची दुरुस्ती व रंगरंगोटीची कामे करणे अपेक्षित होते. मात्र, संबंधित कामांसाठीचा निधी थेट संबंधित विक्रेते किंवा काम करणाऱ्यांना देण्याऐवजी मुख्याध्यापकांनी स्वतःच्या बँक खात्यात वर्ग करण्याबाबत शाळा व्यवस्थापन समितीचा लेखी ठराव घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, या निधीतून नेमकी किती रक्कम खर्च करण्यात आली, कोणत्या कामासाठी किती खर्च झाला आणि त्यासंबंधीची बिले व पावत्या काय आहेत, याची माहिती मागितल्यानंतर ती देण्यास टाळाटाळ करण्यात आल्याचा दावा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. याबाबत मुख्याध्यापक कुशाल राठोड यांच्याकडे मोबाईलद्वारे विचारणा केली असता, रंगरंगोटी तसेच इतर कामे करणाऱ्या काही व्यक्तींकडे बँक खाते नसल्याने त्यांच्या कामाचे पैसे स्वतःच्या खात्यात घेऊन त्यांना अदा केल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, याच शाळेतील ढोलकी खरेदीचाही मुद्दा ऐरणीवर आला आहे. मार्च २०२६ मध्ये शाळेतील गीत व इतर शैक्षणिक उपक्रमांसाठी जीएसटी बिलासह ढोलकी खरेदी केल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आल्याचा आरोप आहे. मात्र, मार्च ते ऑक्टोबर या कालावधीत शाळेत ढोलकी उपलब्ध नव्हती, असा दावा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर बोलाडा यांनी केला आहे. शाळेसाठी खरेदी केलेली ढोलकी कुठे आहे, अशी वारंवार विचारणा करूनही मुख्याध्यापकांकडून ती अन्य शाळेत नेल्याचे कारण सांगण्यात येत होते. शाळेच्या निधीतून खरेदी केलेली वस्तू दुसऱ्या शाळेत किती काळ ठेवण्यात येणार, असा सवाल समितीने उपस्थित केला आहे. अखेर हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर २ नोव्हेंबर रोजी ढोलकी पुन्हा शाळेत जमा करण्यात आल्याचा आरोपही समितीने केला आहे.
शाळेत विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि सत्याची शिकवण देण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते. मात्र, शालेय निधीच्या व्यवहारातच पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित होत असतील, तर विद्यार्थ्यांसमोर कोणता आदर्श ठेवला जाणार, असा सवाल पालक व शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांकडून उपस्थित केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून निधीच्या खर्चाचा तपशील, खरेदीची बिले, बँक व्यवहार आणि प्रत्यक्ष कामांची पडताळणी करण्याची मागणी होत आहे.
या प्रकरणाबाबत पंचायत समिती डहाणूच्या गटविकास अधिकारी (उच्च श्रेणी) पल्लवी सस्ते यांच्याशी संपर्क साधला असता, शाळा व्यवस्थापन समितीकडून अद्याप लेखी तक्रार प्राप्त झालेली नसली, तरी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने चौकशी करण्याचे आदेश देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. चौकशीअंती संबंधित शिक्षक दोषी आढळल्यास त्यांच्यावर नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.