Illegal Sand Mining Palghar 
पालघर

Illegal Sand Mining Palghar : वैतरणा खाडीत रेती माफियांवर महसूल विभागाचा ‘सर्जिकल स्ट्राईक’

अनधिकृत रेती उत्खनन करणारी लोखंडी बोट, सक्शन पंप जाळून नष्ट; तीन वाहने जप्त

पुढारी वृत्तसेवा

पालघर : पालघर आणि वसई तालुक्याच्या सीमा भागात वैतरणा खाडीत सुरू असलेल्या अनधिकृत रेती उत्खननावर जिल्हा गौण खनिज भरारी पथकाने धडक कारवाई करत रेती माफियांना दणका दिला आहे. जिल्हा गौण खनिज विभागाचे नायब तहसीलदार तथा भरारी पथक प्रमुख चंद्रकांत पवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या कारवाईत अनधिकृत रेती उपसा करणारी लोखंडी बोट आणि सक्शन पंप जाळून नष्ट करण्यात आले. तसेच विनापरवाना रेती वाहतूक करणारे दोन ट्रक आणि दगड वाहतूक करणारा एक ट्रक जप्त करण्यात आला आहे.

वैतरणा खाडी परिसरात अनधिकृत रेती उत्खनन सुरू असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे जिल्हा गौण खनिज भरारी पथकाने नियोजन करून खाडी परिसरात सापळा रचला. खाजगी बोटीतून वैतरणा खाडी पात्रात पोहचून रेती उत्खनन करताना आढळून आलेली लोखंडी बोट आणि सक्शन पंप ताब्यात घेण्यात आले. पथकाने तातडीने कारवाई करत प्रथम सक्शन पंप आणि बोटीला आग लावली. त्यानंतर लोखंडी बोट खाडीच्या पाण्यात बुडवून नष्ट करण्यात आली. या कारवाईमुळे रेती तस्करांच्या अवैध कारवायांना मोठा आळा बसणार असल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, कारवाईवेळी विनापरवाना रेती वाहतूक करणारे दोन ट्रक आणि दगड वाहतूक करणारा एक ट्रक पथकाच्या हाती लागला. तिन्ही वाहने जप्त करण्यात आली आहेत.घेऊन पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. तीन ट्रक आणि रेती आणि दगड मिळून 75 लाखांचा मुद्देमाल जप्त कारण्यात आला आहे. जिल्हाधिकारी तसेच जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली.

मात्र, कारवाईदरम्यान भरारी पथकावर दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्याची तसेच काही जणांकडून धमक्या देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तरीही महसूल विभागाच्या पथकाने धाडसी कारवाई करत अवैध रेती उत्खननाविरोधात कठोर भूमिका घेतली. वैतरणा खाडीतील अनधिकृत रेती उत्खननामुळे पर्यावरणाची हानी तसेच शासनाच्या महसुलाचे नुकसान होत असल्याने महसूल विभागाकडून यापुढेही अशाच प्रकारच्या धडक कारवाया सुरू राहणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. या कारवाईमुळे रेती माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT