Palghar Child Malnutrition Pudhari
पालघर

Palghar Child Malnutrition: पालघरमध्ये कुपोषणाविरुद्ध नवा प्रयोग; बालकांच्या आहारात तृणधान्यांचा समावेश करण्याचा प्रयत्न

मिलेट्सपासून मुलांना आवडणारे पदार्थ तयार करण्याचा अभ्यास; कुपोषण कमी करण्यासाठी तज्ज्ञांची पुढाकार – डॉ. दीपक सावंत

पुढारी वृत्तसेवा

पालघर : हनिफ शेख

जिल्ह्यातील अति तीव्र कुपोषित बालके ही मध्यम तीव्र कुपोषित बालकांमध्ये म्हणजेच सॅममधील मुले मॅम मध्ये येतात मात्र मुले ही साधारण श्रेणी येण्याची संख्या अतिशय कमी आहे.त्यामुळे या मुलांना साध्या श्रेणीत आणण्याचे मोठे आव्हान आहे. यासाठी विविध स्तरावर अभ्यास सुरू आहे. आपल्या भागात उपलब्ध असलेली मिलेट्स म्हणजेच तृणधान्य यांच्यापासून लहान मुलांना आवडणारे विविध पदार्थ बनवून ते पुरवठा करता येतील का यासाठी मिलेट रिसर्च सेंटर हैदराबाद यांची देखील मदत आम्ही घेत आहोत कारण यापासून मॅगी विविध बिस्किटे असे पदार्थ जे लहान मुलांना आवडतात हे सुद्धा बनवू शकतो. यामुळे या भागातील कुपोषण कमी करण्यास अधिक मदत होईल अशी माहिती टास्क फोर्स कुपोषण निर्मूलनचे अध्यक्ष आणि राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली आहे. पालघर जिल्ह्यात त्यांचा नुकताच दौरा पार पडला त्यावेळी ते बोलत होते.

त्यातून त्यांनी आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनास विविध सूचना देखील केल्या आहेत. यावेळी माहिती देताना सांगून त्यांनी सांगितले की जिल्ह्यातील कुपोषणाचे प्रमाण जरी कमी झाले असले तरी माता मृत्यूचे प्रमाण मात्र वाढलेले आहे. चिंतेची बाब असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. मात्र या माता मृत्यू ह्या खाजगी रुग्णालयात जास्त झाल्याचे देखील त्यांनी पुष्टी यावेळी जोडली. यासाठी जिल्ह्याकडे सर्वांचेच बारीक लक्ष असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. सावंत यांनी यावेळी उपजिल्हा रुग्णालय कासा,प्राथमिक आरोग्य केंद्र आमगाव याशिवाय मनोर येथे सुरू असलेले ट्रॉमा केअर सेंटर अशा विविध आरोग्य केंद्रांना भेट देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या यावेळी पावसाळापूर्व तयारीसाठी देखील त्यांनी जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या.

कारण की याच दिवसात कुपोषण आणि बालमृत्यूंचा आकडा वाढतो तो वाढू नये यासाठी महिला बालविकास आरोग्य विभाग यांच्यासोबत आढावा बैठक देखील घेण्यात आली. यावेळी याबाबतची थोडी देखील वाढ दिसली तरी आरोग्य विभाग आणि महिला बाल विकास विभागाने तातडीने त्यावर कार्यवाही करणे आवश्यक आहे. अशा सूचना त्यांनी दिल्या याशिवाय माता मृत्यू रोखण्यासाठी प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात उपायोजना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय गरोदर मातांच्या तपासण्यांकडे देखील अधिकचे लक्ष देणे आवश्यक आहे. त्यातूनच माता मृत्यू आणि कुपोषण देखील रोखता येऊ शकते अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. ज्याप्रमाणे कमी वजनांची बालके ही अति तीव्र आणि मध्यम तीव्र कुपोषित श्रेणीत येत होती

याचप्रमाणे आता जास्त वजनाची बालके देखील कुपोषणाच्या श्रेणीत येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे याशिवाय कुपोषित बालकांची पूर्ण पार्श्वभूमी तपासून काम केल्यास जास्त अडचणी येणार नाहीत अशा सूचना त्यांनी दिल्या. यावेळी पालघर विधानसभेचे आमदार राजेद्र गावीत, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रामदास मराड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संतोष चौधरी, जिल्हा बालविकास अधिकारी हुंडेकर आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात सक्षम आरोग्य यंत्रणा कधी?

यावेळी कुपोषण निर्मूलन टास्क फोर्सचे प्रमुख दीपक सावंत यांना पत्रकारांनी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कधी सक्षम होईल असा सवाल करीत येथील पालघर जिल्हा रुग्णालय, ट्रॉमा केअर सेंटर यांची कामे कधी पूर्ण होतील आज जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांची विविध प्रकल्प हाती घेण्यात आली आहेत यावर पाण्यासारखा पैसा खर्च होत असताना आज जिल्ह्यात सक्षम आरोग्य यंत्रणा नसावी असा सवाल केला याला उत्तर देताना आमदार राजेंद्र गावित यांनी सांगितले की या कामांची उद्घाटने 1 मे रोजी होतील. मात्र यावर उपस्थित आरोग्य अधिकाऱ्यांनी यासाठी अजून आवश्यक निधी उपलब्ध झाला नसल्याचे सांगितल्या नंतर गावीत यांनी या उद्घाटनाबाबत आरोग्य मंत्र्यांच्या सोबत बैठक झाली तेंव्हा त्यांनी ही माहिती दिली असल्याचे स्पष्टीकरण देऊन 1 मे रोजीच्या उद्घाटन बाबतच्या वक्तव्या वरुन माघार घेतली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT