

तलासरी : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तलासरी येथे लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या टेम्पोला भीषण अपघात झाला असून अपघातात टेम्पो मधील 21 वऱ्हाडी गंभीर आणि किरकोळ जखमी झाले आहेत.
डहाणू तालुक्यातील आंबोली येथून टेम्पो मध्ये लग्नाचे वऱ्हाड घेऊन तलासरी तालुक्यातील डोंगरी येथे निघाले असताना मुंबई अहमदाबाद महामार्गावर तलासरी उड्डाणपूला जवळ रविवारी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. महामार्गावर उभा असलेल्या कंटेनरला टेम्पो मागे जाऊन धडकल्याने भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत वऱ्हाड घेऊन निघालेल्या टेम्पो मधील सहा गंभीर तर सोळा
किरकोळ जखमी झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसून जखमींना तलासरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गंभीर जखमींना वेदांत हॉस्पिटल येथे रेफर करण्यात आले आहे. वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या टेम्पो मधील महिला आणि लहान मुलांचा जखमीमध्ये समावेश आहे.
भीषण अपघातात टेम्पो मधील 21 वऱ्हाडी जखमी झाले असून अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी तात्काळ रूग्णवाहिकेला संपर्क साधून बोलावून घेतले. घटनास्थळी पाच-सहा ॲम्बुलन्स दाखला होऊन सर्व जखमीना तलासरी ग्रामीण रुग्णालयात आणि गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी हॉस्पिटल येथे हलवण्यात आले आहे. या अपघाताची नोंद तलासरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.