Palghar Labour Rehabilitation Pudhari
पालघर

Palghar Labour Rehabilitation: पालघरमध्ये बंधकामगार मुक्तीसाठी निर्णायक पाऊल; जिल्हा प्रशासन व इंटरनॅशनल जस्टिस मिशनमध्ये सामंजस्य करार

मुक्त झालेल्या कामगारांच्या सन्मानपूर्ण व शाश्वत पुनर्वसनासाठी संयुक्त प्रयत्नांना सुरुवात

पुढारी वृत्तसेवा

पालघर : बंधकामगार प्रथेला आळा घालून मुक्त करण्यात आलेल्या कामगारांचे सन्मानपूर्ण व शाश्वत पुनर्वसन सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने पालघर जिल्ह्यात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. जिल्हा प्रशासन आणि इंटरनॅशनल जस्टिस मिशन (खगच) यांच्यात जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली सामंजस्य करार (चेण) करण्यात आला आहे.

या कराराअंतर्गत पालघर जिल्ह्यात मुक्त करण्यात आलेल्या बंधकामगारांच्या प्रभावी पुनर्वसनासाठी दोन्ही संस्था संयुक्तपणे काम करणार आहेत. पुनर्वसन प्रक्रियेला गती देताना रोजगार, सामाजिक सुरक्षा, शासनाच्या विविध योजनांचा लाभ आणि सन्मानपूर्ण जीवनमान यावर विशेष भर देण्यात येणार आहे. यासोबतच बंधकामगार प्रतिबंधक कायदे, त्यांची अंमलबजावणी तसेच कार्यपद्धती याबाबत जिल्हा व क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांची संस्थात्मक क्षमता बळकट करण्यात येणार आहे. यामुळे बंधकामगार प्रकरणांची ओळख, सुटका, पुनर्वसन आणि पाठपुरावा या सर्व टप्प्यांमध्ये अधिक परिणामकारकता येईल,

या सहकार्याचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे बंधकामगार प्रथेचे सखोल विश्लेषण आणि असुरक्षिततेचे नकाशीकरण यामुळे कोणत्या भागांमध्ये, कोणत्या समुदायांमध्ये बंधकामगार होण्याचा धोका अधिक आहे, हे स्पष्टपणे समोर येणार असून भविष्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवता येणार आहेत.जिल्हा प्रशासन आणि यांच्यातील हा करार सामाजिक न्याय, मानवाधिकार संरक्षण आणि समावेशक विकासाच्या दिशेने पालघर जिल्ह्यासाठी एक मैलाचा दगड ठरणार आहे. काही महिन्यांपूर्वीच मोखाडा तालुक्यातील अनेक वेठबिगारांची सुटका याच आयजीएम म्हणजेच इंटरनॅशनल जस्टीस मिशनच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती.

यावेळी तब्बल दहा वर्षाहून अधिक काळ गाव सोडलेल्या मजुरांना त्यांनी परत आणण्यात यश मिळवले होते यावेळी जिल्हाधिकारी जाखड यांनी देखील मोखाडा येथील त्यांना ठेवण्यात आलेल्या ठिकाणी भेट देऊन या बाबींची पडताळणी करून या वेठबिगारांना आधार कार्ड आणि बाकी सरकारी ओळख देणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या सूचना देखील येथील प्रशासनाला केल्या होत्या. यामुळे आता इंटरनॅशनल जस्टीस मिशन आणि पालघर प्रशासन यांच्या या समंजस करारामुळे वेठबिगारीला पूर्णपणे आळा आणण्यास मदत होणार असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT