Children Drowning in Boisar
बोईसर: बोईसरमधील महावीर कुंज इमारतीलगत असलेल्या खासगी मालकीच्या मोकळ्या जागेतील पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून तीन मुलांचा मृत्यू झाला आहे. ही हृदयद्रावक घटना शुक्रवारी (दि.२७) दुपारी दोनच्या सुमारास घडली असून या घटनेने गणेश नगर परिसरातील कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
मृत मुलांची नावे सूरज यादव (वय ६), धीरज यादव (वय १२) हे दोघे सख्खे भाऊ होते. तर अंकित (वय १२) अशी आहेत. चौथा एक मुलगा मात्र थोडक्यात बचावला असून घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी त्याला बाहेर काढले आहे.
महावीर कुंज इमारतीच्या लगत असलेल्या खासगी भूखंडावर भरावासाठी मुरूम मातीचे उत्खनन करण्यात आले होते. मात्र, उत्खननानंतर निर्माण झालेला खोल खड्डा पावसामुळे पाण्याने भरून गेला होता. स्थानिक मुले नेहमीप्रमाणे आंघोळीसाठी याच खड्ड्याजवळ गेली होती. मात्र, पाण्याची खोली लक्षात न आल्यामुळे तिघे पाण्यात बुडाले.
घटनेची माहिती मिळताच बोईसर पोलिस आणि औद्योगिक अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. काही वेळाच्या शोधकार्यानंतर तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.
या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मुलांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. स्थानिक नागरिकांनी अनधिकृत उत्खनन व पाण्याने भरलेल्या असुरक्षित खड्ड्यांविषयी तीव्र संताप व्यक्त करत प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे.