

Saphale Palghar Local Train Demand
सफाळे : सफाळे आणि आसपासच्या परिसरातील लोकल प्रवाशांनी वेळच्या वेळी ट्रेन सुरू होण्याच्या मुद्यावर समाधान व्यक्त केले आहे. मात्र अजूनही सकाळच्या वेळेत -विशेषतः ५.३० वाजता आणि ८.१५ वाजता धावणाऱ्या लोकलमध्ये सफाळे स्थानकावरून चढता न येण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.
या वेळेतील ट्रेनमध्ये चढणे म्हणजे युद्ध जिंकण्यासारखं असल्याचे प्रत्यक्ष प्रवास करणारे प्रवासी सांगतात, अनेकदा महिलांना, विद्यार्थ्यांना आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रवास करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते.
त्यामुळे पालघरहन काही लोकल ट्रेन सुरू करून सफाळेकरांना जागा मिळावी, अशी मागणी प्रवाशांतून जोर धरू लागली आहे. या संदर्भात रेल्वे प्रशासनाशी झालेल्या चर्चेमध्ये खालील तीन मुख्य तांत्रिक अडचणी अधोरेखित करण्यात आल्या आहेत. पालघर स्थानकावरून लोकल सुरू करण्यासाठी स्वतंत्र प्लॅटफॉर्म किंवा ट्रॅकची आवश्यकता असते. सध्या ही सुविधा उपलब्ध नसल्याने गाड्यांची वेळ व ट्रॅफिक नियंत्रण करताना अडचण येते.
तसेच लोकल ट्रेनच्या देखभाल आणि रात्री उभ्या ठेवण्याची व्यवस्था करणारा कारशेड पालघरमध्ये नाही. त्यामुळे गाडीची सुरक्षा, दुरुस्ती आणि देखभाल शक्य होत नाही. तसेच ट्रेन चालवणाऱ्या मोटरमन व गार्ड यांच्यासाठी सफाळा अथवा पालघरमध्ये विश्रांती व निवासाच्या सुविधा नाहीत. त्यामुळे ड्युटी वेळेचे व्यवस्थापन शक्य नसते. पालघरवरून लोकल सुरू करणे तात्काळ शक्य नसले तरी रेल्वेने या मागणीची दखल घेतली आहे. तांत्रिक सुधारणा, कारशेडची उभारणी, विश्रांतीगृहाची व्यवस्था यावर लवकरात लवकर काम सुरू झाल्यास भविष्यात पालघरहून लोकल सेवा सुरू होऊ शकते.
रेल्वे प्रशासनाने ही गंभीर गरज लक्षात घेऊन धोरणात्मक पातळीवर निर्णय घ्यावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. मुंबईच्या मध्य रेल्वेप्रमाणेच काही लोकल ट्रेन पालघरहून सुरू करून सफाळ्यात थांबा देण्यात यावा, ही मागणी अधिकाधिक प्रबळ होत आहे.