पालघर: हनिफ शेख
कुपोषणाचे प्रमाण कमी व्हावे बालमृत्यू होऊच नये यासाठी शासनसारावरून अनेक उपाय योजना करण्यात येत असतात. याआधी जव्हार मोखाडा तालुक्यात कुपोषणाचे प्रमाण अधिक असायचे तर बालमृत्यूचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणावर होते मात्र आता शासन स्तरावरून मोठ्या प्रमाणावर उपाययोजना स्वयंसेवी संस्थांची मदत एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या योजना यांच्या मदतीने कुपोषणाचे प्रमाण कमी झाले असले तरी बालमृत्यू काही पाठ सोडायला तयार नाही.
एप्रिल 2025 ते ऑगस्ट अखेर पर्यंतची बालमृत्यूची आकडे पाहता आजही या पाच महिन्यात 0ते 5 या वयोगटातील तब्बल 112 बालकांना हे जग पाहता आलेले नाही हे अतिशय लाजिरवाणी गोष्ट असल्याचे दिसून येते. तर याहीपेक्षा भयंकर म्हणजे आजही जिल्ह्यात 301 बालके दुर्धर आजाराने ग्रस्त असल्याचे चित्र असून ही बालके मृत्यूच्या दाढेत असल्याने या सर्वांना वाचविण्यात आरोग्य विभागाला यश येईल का असा सवाल आता निर्माण झाला आहे तर अत्यंत तीव्र कुपोषित 68 आणि मध्यम कुपोषित 835 अशी एकूण 903 बालक आजही कुपोषित या श्रेणीत असल्याचे दिसून येत आहेत.
जिल्ह्यात माता मृत्यू बालमृत्यू यांचे प्रमाण आजही लक्ष्मी आहे या आकडेवारीत घट झाली असं जरी सांगताय येत असले तरी आजच्या युगात आरोग्य सेवेपासून वंचित राहून मातांचा मृत्यू होणे किंवा हे जग बघण्या अगोदरच बालकांचे होणारे मृत्यू हे नक्कीच भूषणावह नाही. यामुळे या मृत्यूचे प्रमाण 0 येण्यासाठी शासनाला मोठ्या प्रमाणावर अजूनही काम करणे आवश्यक आहे . आज घडीला पाच महिन्यात झालेल्या बालमृत्यूंचे प्रमाण पाहता जव्हार आणि डहाणू या तालुक्यातील आकडेवारी अधिक दिसून येते मात्र या दोन्ही ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय असल्याने त्याजागी मृत झालेल्या बालकाची नोंद त्या तालुक्यात होत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.
आज एकीकडे पालघर जिल्ह्यात जागतिक स्तरावरचे प्रकल्प येऊ पाहत आहेत.तर दुसरीकडे उपचाराअभावी बालकांचे आणि मातांचं मरण अशी विदारक स्थिती जिल्ह्यात दिसून येत आहे. कुपोषित बालकांची निवड श्रेणी ही वजनानुसार उंची घेऊन तीव्र कुपोषित बालके निवडले जातात तर वय वजन आणि उंची यांचे प्रमाण न जुळल्यास अशा बालकांना मध्यम कुपोषित असे संबोधलं जातं तर शून्य ते पाच वर्षाच्या आतील बालकांच्या मृत्यूला बालमृत्यू असे सांगितले जाते.
जव्हार तालुक्यात प्रमाण वाढले
आजवर कुपोषणाच्या बाबतीत जिल्ह्यात सगळ्यात जास्त आकडेवारी ही मोखाडा तालुक्यातील असायची मात्र याबाबतच्या अनेक बातम्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध होऊन याविषयी मोठ्या प्रमाणावर जनजागृती सुद्धा झाली यानंतर स्वयंसेवी संस्थांनी सुद्धा या भागात काम केले आरोग्य विभागाने एकात्मिक बालविकास मार्फत सुद्धा कुपोषण आणि बालमृत्यू बाबतच्या योजना या ठिकाणी प्रभावीपणे राबवल्या गेल्या. त्यातूनच आज मोखाड्यातील प्रमाण अत्यल्प असले तरी सध्या जिल्ह्यात जवाहर तालुक्याची आकडेवारी वाढलेली आहे.
या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय असल्याने बाल मृत्यूची नोंद जास्त दिसत असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले असले तरी आज दुर्धर आजाराने ग्रस्त बालकांची जव्हार तालुक्यातील संख्या 46 आहे तर कुपोषित बालकांची संख्या 258 एवढी आहे आणि बालमृत्यू 25 अशी नोंद आहे. यामुळे या आकडेवारी कडे पाहता जव्हार तालुक्यावर आता अधिकचे लक्ष देणे गरजेचे बनले आहे.
301 बालक दुर्धर आजाराने ग्रस्त
आज 112 बालमृत्यू अशी आकडेवारी असली तरी आज घडीला दुर्धर आजाराने ग्रस्त अशा तब्बल 301 बालकांची नोंद पालघर जिल्ह्यात आहे ही अतिशय गंभीर बाब आहे कारण की दुर्धर आजाराने ग्रस्त बालकांना जीवनदान देण्याची मोठी जबाबदारी आरोग्य विभागावर आहे कारण की ही मुले दुर्धर आजाराने ग्रस्त आहेत याचाच अर्थ ती मृत्यूच्या दाढेत आहे त्यातून त्यांना सही सलामत बाहेर काढण्याचे मोठे आव्हान जिल्हा आरोग्य विभागासमोर उभे राहिले आहे.