Padma Shri Bhiklya Dhinda Pudhari
पालघर

Padma Shri Bhiklya Dhinda: पद्मश्री तारपा वादक भिकल्या धिंडा आर्थिक अडचणीत; शासनाने मदत करावी – आमदार तांबे

वारली आदिवासी संस्कृतीचे जतन करणाऱ्या ज्येष्ठ कलाकाराची दयनीय अवस्था; सभागृहात प्रश्न उपस्थित

पुढारी वृत्तसेवा

पालघर : पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील वाळवंडा गावचे आदिवासी वारली समाजाचे ज्येष्ठ तारपा वादक आणि पद्मश्री पुरस्कार विजेते भिकल्या लाडक्या धिंडा यांची सध्या अत्यंत बिकट परिस्थिती असल्याची बाब समोर आली आहे. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत तातडीने मदत करावी, अशी मागणी विधानपरिषद आमदार सत्यजीत तांबे करण्यात आली आहे.

भारतीय आदिवासी संस्कृतीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या पारंपरिक तारपा वादन कलेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी आयुष्यभर योगदान देणाऱ्या भिकल्या धिंडा यांना केंद्र शासनाकडून पद्मश्री पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे. हा सन्मान केवळ एका कलाकाराचा नसून संपूर्ण वारली आदिवासी संस्कृतीचा गौरव मानला जातो. मात्र इतक्या मोठ्या राष्ट्रीय सन्मानानंतरही या ज्येष्ठ कलावंतांची सद्यस्थिती अत्यंत दयनीय असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आज केवळ एका एकर भातशेतीवर कसाबसा चालत असून आर्थिक अडचणींमुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

यासंदर्भा सभागृहाचे लक्ष वेधत संबंधित प्रश्न आमदार सत्यजीत तांबे यांच्याकडून उपस्थित करण्यात आला. आदिवासी संस्कृतीचा अमूल्य वारसा जपणाऱ्या अशा कलावंतांना सन्मानपूर्वक जीवन जगता यावे यासाठी शासनाने विशेष मदत योजना राबविण्याची गरज असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

भिकल्या धिंडा यांच्यासारख्या लोककला जपणाऱ्या कलाकारांची परिस्थिती सुधारण्यासाठी शासनाने आर्थिक मदत, निवास व्यवस्था तसेच लोककला संवर्धनासाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे. पद्मश्री सारखा सर्वोच्च नागरी सन्मान मिळालेल्या कलाकाराची अशी परिस्थिती असणे ही खेदजनक बाब असल्याने शासनाने तातडीने लक्ष घालून ठोस उपाययोजना कराव्यात, अशी भावना सांस्कृतिक क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT