पालघर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील ढेकाळे येथील वाघोबा खिंड परिसरात अज्ञात वाहनाने दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मुंबई वाहिनीवर अपघात झाला होता, तिन्ही मृतदेह मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले असून मनोर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरु असून पोलिसांकडून वाहनाचा शोध घेतला जात आहे.
शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मुंबई अहमदाबाद महामार्गावर मुंबईच्या दिशेने जात असलेल्या दुचाकीला वाघोबा खिंड भागात अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. दुचाकीवरील तिघांनाही अज्ञात वाहनाने चिरडल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला.अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या मनोर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन मनोर ग्रामीण रुग्णालयात हलवले आहेत.
मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेण्यात येत आहे. दरम्यान, अपघात करून पसार झालेल्या अज्ञात वाहनाचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील अपघातांच्या मालिका सुरु असल्यामुळे वाहन चालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वरई परिसरात केवळ 500 मीटर अंतरात सहा स्पीड ब्रेकर बसवण्यात आल्यामुळे वाहतुकीस गंभीर धोका निर्माण झाला असून अचानक ब्रेक लागल्याने अपघातांची शक्यता वाढली आहे. या प्रकारामुळे स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
महामार्ग या अत्यंत वर्दळीच्या मार्गावर हायवे पोलिसांनी वाहने थांबवण्यासाठी हा उपाय अवलंबल्याचे समोर आले आहे. मात्र यामुळे भरधाव वेगात येणाऱ्या वाहनांना अचानक ब्रेक लावावे लागत असल्याने मागील वाहनांची धडक होण्याच्या घटना घडत आहेत.