खानिवडेः विश्वनाथ. एस. कुडू
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोंडी, रस्त्यातील अनेक अडथळे, वाजवीपेक्षा अवजड वाहतूक, अवैध पार्किंग, बेशिस्त वाहन चालक, यामुळे महामार्गावरील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. ह्या त्रासदायक प्रवासात परिवहन विभागाने धडक तपासणी मोहीम राबवणे गरजेचे असून वाहनांच्या वर्दळीला येणारे अडथळे दूर करण्याला प्रथम प्राधान्य देणे आवश्यक आहे.
महामार्गावरील वाहतूक कोंडी आता केवळ गैरसोयीचा विषय न राहता जीवघेणा प्रश्न बनला आहे. रस्त्यातील अडथळे, वाजवीपेक्षा जास्त अवजड वाहतूक, महामार्गाच्या कडेला सर्रास होणारे अवैध पार्किंग, आणि यामध्ये बेशिस्त बेदरकार वाहनचालक यामुळे सामान्य नागरिकांचा प्रवास अक्षरशः नरक यातनेत बदलला आहे. मात्र एवढे सगळे उघडपणे घडत असताना परिवहन विभाग नेमके काय करत आहे, असा थेट सवाल आता उपस्थित केला जात आहे. दररोज सकाळ-संध्याकाळ महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून किरकोळ अंतरासाठीही नागरिकांना तासन्तास अड़कावे लागत आहे. अवजड वाहने नियमांचे उल्लंघन करून भरधाव वेगात धावत असताना अपघाताचा धोका वाढत चालला आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यावरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे.
देशातील सर्वात जास्त वाहनांच्या वर्दळीचा मार्ग म्हणून ४८ क्रमांकाचा मुंबई दिल्ली राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळखला जात असून याच महामार्गाच्या कडेला बिनधास्तपणे उभी केलेली
वाहने, अतिक्रमण आणि नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईचा कुठलाही धाक उरलेला दिसत नाही. धडक तपासणी मोहीम केवळ कागदापुरतीच आहे का, की ती प्रत्यक्षात राबवली जाणार आहे, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
वाहतूक कोंडीमुळे वेळ, इंधन आणि मानसिक त्रास सहन करणाऱ्या नागरिकांचा संयम आता सुटत चालला आहे. प्रशासनाने अपघात घडण्याआधीच जागे होऊन तातडीने धडक तपासणी मोहीम राबवावी. अवजड वाहतूक, अवैध पार्किंग व बेशिस्त चालकांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा महामार्गावरील वाढते अपघात याला जबाबदार कोण, हा प्रश्न अनुत्तरितच राहील. सद्धया मागील काही दिवसांपासून या महामार्गावर खूप मोठी वाहनांची कोंडी झाली नसली, तरी महामार्गावरील वर उल्लेख केलेले अडथळे दूर केले नाहीत, तसेच सहज सुलभ पाण्याचा निचरा व्हावा यासाठी
निचऱ्याचे मार्ग मोकळे केले नाही, तर यंदाही पावसाळ्यात बसई पुर्वेत कोंडीचा सामना हा सुरूच राहणार आहे.
नुकताच ३फेब्रुवारी ला मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील आडोशी बोगद्याजवळ घडलेल्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील अवजड वाहनांवर व्यापक आणि पारदर्शक तपासणी मोहीम राबवण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत मोटार परिवहन व पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी स्पष्ट शब्दांत सूचित केले आहे. अपघात रोखायचे असतील तर नियमांची केवळ अंमलबजावणी नव्हे, तर जागरूकतेची चळवळ उभी राहिली पाहिजे अशी सूचनाही त्यांनी वाहतूक नियंत्रण संबंधितांना दिली आहे. कारण
३ फेब्रुवारी रोजी झालेल्या अपघातामुळे तब्बल ३२ तास पुणे मुंबई महामार्ग वाहतुकीसाठी विस्कळीत झाला होता. यावर काटेकोर अंमलबजावणी अपेक्षित परिवहन मंत्र्यांनी राज्यातील सर्व अवजड वाहनांची तांत्रिक तपासणी काटेकोर आणि पारदर्शक पद्धतीने व्हावी, असे निर्देश दिले आहेत. विशेषतः फॉर्म १३८/अ अंतर्गत दिल्या जाणाऱ्या वाहन योग्यता प्रमाणपत्र प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यावर भर देण्यात आला. काही प्रादेशिक परिवहन कार्यालयांतून प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणपत्रे दिल्याचे निदर्शनास आल्याने त्याबाबत तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहेत. मात्र वरील निर्देश सूचनांवर संबंधितांकडून काटेकोर अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे.
भाष्य करताना मंत्री सरनाईक म्हणाले होते की चालकांच्या वाहन चालवण्याच्या पद्धतीवर नियंत्रण आणि प्रबोधन हीच अपघातमुक्त महामार्गाची गुरुकिल्ली आहे, यासाठी व्यापक प्रमाणावर वाहन चालकांच्या कसेही वाहन चालवणार ही मर्जी रोखण्यासाठी प्रबोधन करणे गरजेचे झाले आहे.
वाहतूक नियंत्रण यंत्रणा आहे त्यापेक्षा अधिक सक्रिय करणे त्याचप्रमाणे महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणांची (ब्लॅक स्पॉट्स) माहिती चालकांपर्यंत पोहोचवणे, त्या भागात प्रवेश करण्यापूर्वी समुपदेशन व सूचना देणे, तसेच पोलीस व परिवहन विभागाने संयुक्तरीत्या जनजागृती मोहीम राबवणेया उपाययोजना तातडीने अमलात आणणे मुंबईला जोडणाऱ्या महामार्गावर अत्यंत गरजेचे आहे.