Palghar Truck Accident Pudhari
पालघर

Palghar Truck Accident: अहमदाबाद महामार्गावर अपघातात ट्रकचालकाचा मृत्यू; क्लीनर गंभीर

वैतरणा पुलाच्या दुरुस्तीतील सुरक्षेचा अभाव, दीड महिन्यात चार अपघात

पुढारी वृत्तसेवा

पालघर: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पालघर तालुक्यातील टेन गावाच्या हद्दीतील सायलेंट रिसॉर्टजवळ मुंबई वाहिनीवर मंगळवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात ट्रक चालकाचा मृत्यू झाला असून क्लीनर गंभीर जखमी झाला आहे.

वैतरणा नदीवरील पुलाच्या दुरुस्तीच्या कामासाठी उभारण्यात आलेल्या अडथळ्याला ट्रक धडकल्याने अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर सुमारे तासाभराने भरधाव वेगातील पिकअप टेम्पोने अपघातग्रस्त ट्रकला धडक दिल्याने दिल्याने दुसरा अपघात घडला.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील दुर्वेस गावाच्या हद्दीतील वैतरणा नदीवरील पूल धोकादायक झाल्याने २७ ऑगस्ट २०२६ पासून पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ठेकेदारामार्फत पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. मुंबई वाहिनीसाठी वैतरणा नदीवर दोन स्वतंत्र पूल असल्यामुळे वाहतूक दुसऱ्या पुलावरून वळवण्यात आली आहे.

मंगळवारी पहाटेच्या तीन वाजण्याच्या सुमारास टेन गावाजवळ रिसॉर्ट परिसरातील उतार आणि वळणाच्या भागात भरधाव वेगातील ट्रक चपुलावरील वाहतूक बंद करण्यासाठी लावण्यात आलेल्या माती आणि सिमेंट काँक्रीटच्या अडथळ्याला धडकला आणि ट्रक उलटला. या अपघातात चालक केबिनमध्ये अडकून पडला होता.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या सहाय्याने तब्बल एक ते दीड तास प्रयत्न केल्यानंतर चालकाला बाहेर काढण्यात यश आले. मात्र, गंभीर जखमी झालेल्या चालकाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता.

गंभीर जखमी क्लीनरला उपचारासाठी मनोर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.चालकाला बाहेर काढण्याचे काम सुरू असताना भरधाव वेगाने आलेल्या पिकअप टेम्पोने उलटलेल्या ट्रकला धडक दिली. या अपघातात टेम्पो चालक किरकोळ जखमी झाला.

दरम्यान, मस्तान नाका उड्डाणपुल संपल्यानंतर सुरू होणारा उताराचा आणि वळणाचा भाग असल्यामुळे पुलावरील वाहतूक बंद करण्यासाठी उभारलेला अडथळा अपघातप्रवण क्षेत्र बनले आहे.ठिकाणी वाहनचालकांना सावध करणारे सूचना फलक, पुरेशी प्रकाश व्यवस्था आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे.

या ठिकाणी गेल्या दीड महिन्यात तब्बल चार अपघात झाले आहेत. वारंवार अपघात होत असतानाही सुरक्षेच्या उपाययोजना न केल्याने अखेर एका ट्रक चालकाला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अभियंते, सुरक्षा विभाग तसेच पुलाच्या दुरुस्तीचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT