Palghar Leopard News: पालघरच्या मानवी वस्त्यांमध्ये बिबट्याचा मुक्त संचार; वनविभागासमोर आव्हान

महिनाभरात अनेक ठिकाणी बिबट्याचे दर्शन
Leopard
LeopardPudhari File Photo
Published on: 
Updated on: 

नविद शेख

पालघर: जिल्ह्यातील विविध भागांमध्ये बिबट्याचा मानवी वस्त्यांमधील वावर वाढत असून, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. पालघर शहराच्या पूर्व भागातील नवली भोगोले पाडा येथे बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आल्यानंतर जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या काही महिन्यांत पालघर, डहाणू आणि किनारपट्टी भागातील अनेक गावांमध्ये बिबट्या दिसून आला असून, वनविभागाकडून शोधमोहीम राबवूनही बिबट्याला जेरबंद करण्यात अद्याप यश आलेले नाही. मानवी वस्तीकडे बिबट्यांचा वावर वाढत असल्याच्या कारणांचा शोध घेण्यासह कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Leopard
Maharashtra UK Investment Partnership: महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी उत्तम वातावरण; फडणवीस यांचे यूकेच्या उद्योजकांना आवाहन

पालघर शहराच्या पूर्व भागातील नवली येथील भोगोले पाड्यात ११ ऑक्टोबर रोजी धक्कादायक घटना समोर आली. पांगळी कोल्हा (५०) या महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला असून, तिच्यावर बिबट्याने हल्ला केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मयत महिला घरात एकटीच राहत होती. घरापासून काही अंतरावर तिचा मृतदेह आढळून आला.

मृतदेहावर वन्यप्राण्याने हल्ला केल्याच्या खुणा आढळल्याने बिबट्याच्या हल्ल्याचा संशय बळावला आहे. विशेष म्हणजे घटनेच्या दिवशी सकाळी भोगोले पाडा परिसरात बिबट्या दिसल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे.

पालघर तालुक्याच्या पूर्व भागातील साखरे, नावझे आणि दहिसर परिसरात बिबट्याचा वावर सातत्याने आढळून येत आहे. जंगलातून बाहेर पडलेला बिबट्या आता भातशेती आणि गावांच्या वेशीजवळ फिरताना दिसत आहे. नावझे परिसरातील भातशेतीत बिबट्याच्या हालचाली ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर वनविभागाने शोधमोहीम सुरू केली होती.

नावझेतील जुईपाडा येथे बिबट्याने दोन वासरांचा फडशा पाडल्यानंतर त्याला पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात आले; मात्र बिबट्याने वनविभागाच्या सापळ्याला हुलकावणी दिली. साखरे आणि दहिसर परिसरातही बिबट्याच्या हालचाली आढळल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Leopard
Mumbai Orchestra Bar License Fee: ऑर्केस्ट्रा बारचालकांसाठी मोठा दिलासा! परवाना शुल्कवाढ १० टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर

२८ सप्टेंबर रोजी पालघर तालुक्यातील दुर्वेस गावात पट्टेरी वाघ दिसल्याचा संदेश समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. दुर्वेसच्या चाचू पाडा परिसरात वाघ दिसल्याचा दावा करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये भीती पसरली मात्र वनविभागाने या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

घटनास्थळी पाहणी करून ठसे तपासण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. पालघरच्या जंगलात पट्टेरी वाघाचा वावर नसून परिसरात बिबट्यांचा वावर असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे. पालघरच्या तारापूर-चिंचणी परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर कायम आहे.

१७ सप्टेंबर रोजी तारापूर येथील माळी स्टॉप परिसरात बिबट्या दिसून आला.विशेष म्हणजे बिबट्याला पाहताच परिसरातील गुरांनी त्याचा पाठलाग करून त्याला पिटाळून लावल्याचा व्हिडिओ समोर आला होता. बिबट्या मोकळेपणाने फिरत असल्याने नागरिक आणि पशुपालकांमध्ये चिंता वाढली आहे.

सीसीटीव्हीत कैद झाला बिबट्या

पालघर तालुक्यातील अंबोडे गावात १ ऑगस्ट रोजी बिबट्या वस्ती परिसरात फिरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता.वंदेश राऊत यांच्या घराशेजारी रात्रीच्या सुमारास बिबट्याची हालचाल दिसून आली. घटनेनंतर वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.रात्रीच्या वेळी एकट्याने बाहेर पडू नये, घराबाहेर वावरताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.

बिबट्यांचा मानवी वस्तीकडे वाढ

पालघर जिल्ह्यात जंगल, शेती आणि मानवी वस्त्यांच्या सीमारेषा झपाट्याने बदलत आहेत. जंगलातील अधिवास कमी होणे, अन्नाच्या शोधात बिबट्यांचा मानवी वस्तीकडे होणारा प्रवास आणि नैसर्गिक अधिवासातील बदल यामुळे संघर्ष वाढत असल्याचे जाणकारांचे मत आहे.

घटनाक्रम : पालघर जिल्ह्यात बिबट्याचा वावर

१ ऑगस्ट : अंबोडे येथे सीसीटीव्हीत बिबट्या कैद

१५ ऑगस्ट : मोगरबाव येथे कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला

२९ ऑगस्ट : चिंचणी येथे बिबट्याचा सीसीटीव्ही वावर

१७ सप्टेंबर : तारापूर माळी स्टॉप परिसरात बिबट्याचे दर्शन

२८ सप्टेंबर : दुर्वेसमध्ये वाघ दिसल्याच्या अफवेने खळबळ

३ ऑक्टोबर : साखरे-नावझे-दहिसर परिसरात बिबट्याचा वावर

११ ऑक्टोबर : नवली भोगोले पाड्यात महिलेचा संशयास्पद मृत्यू; बिबट्याच्या हल्ल्याचा संशय

मानवी वस्तीत बिबटयाचा उपस्थितीच्या घटननांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे.अनुसूचि एक मधील प्राणी असलेल्या बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी जलद बचाव पथकांची (RRT) संख्या वाढवण्यात येणार आहे.नागरिकांनी सतर्कता बाळगून बिबटयाची माहिती वनविभागाला देणे आवश्यक आहे.जुन्नरच्या धर्तीवर बिबट्याच्या बाबतीत नागरिकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे.

- निरंजन दिवाकर, उपवन संरक्षक, डहाणू.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news