Mango tempo accident Pudhari
पालघर

Mango tempo accident: महामार्गावर आंब्यांनी भरलेला टेम्पो पलटी; आंबे घेण्यासाठी नागरिकांची झुंबड

आंबे घेण्यासाठी नागरिकांनी अक्षरशः झुंबड उडवल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पुढारी वृत्तसेवा

कासा: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून सोमवारी घोळ टोलनाक्याजवळील चामदरा पुल परिसरात आंब्यांची वाहतूक करणारा टेम्पो पलटी झाल्याची घटना घडली. या अपघातात टेम्पोमधील मोठ्या प्रमाणातील आंबे रस्त्यावर विखुरले गेले. त्यानंतर आंबे घेण्यासाठी नागरिकांनी अक्षरशः झुंबड उडवल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातहून मुंबईकडे आंब्यांची वाहतूक करणारा टेम्पो महामार्गावरून जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे टेम्पो रस्त्याच्या कडेला पलटी झाला. अपघातात चालक किरकोळ जखमी झाल्याचे समजते. मात्र टेम्पोमधील आंब्याच्या पेट्या रस्त्यावर पडल्याने संपूर्ण परिसरात आंबे विखुरले गेले.

घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना मिळताच अनेकांनी पिशव्या, गोण्या आणि हातातील उपलब्ध साहित्य घेऊन घटनास्थळी धाव घेतली. काही क्षणातच आंबे गोळा करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली. अनेक जण रस्त्यावर पडलेले आंबे वेचून घेऊन जात असल्याचे दृश्य पाहायला मिळाले.

या प्रकारामुळे काही काळ महामार्गावरील वाहतुकीवरही परिणाम झाला. दरम्यान, सध्या आंब्याचा हंगाम सुरू असल्याने गुजरातमधून मुंबई तसेच इतर भागांकडे मोठ्या प्रमाणात आंब्यांची वाहतूक केली जात आहे. मात्र महामार्गावर अपघातांमुळे वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गेल्या काही दिवसांत या महामार्गावर वारंवार अपघात होत असल्याने नागरिकांकडून प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT