Leopard Attack Pudhari
पालघर

Mokhada Leopard News: खोडाळा विभागातील खेड्यापाड्यात बिबट्याचा मुक्तसंचार; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

वनविभाग अलर्ट; ट्रॅप-कॅमेरे, जनजागृती मोहीम तीव्र

पुढारी वृत्तसेवा

खोडाळा: मोखाडा तालुक्यात काही महिने बिबट्याचा वावर थंडावला होता. मात्र, दि. ३ सप्टेंबरपासून खोडाळ्यापासून अवघ्या पाच ते सहा किलोमीटर अंतरावरील पाथर्डी पैकी शेलमपाडा, डोंगरवाडी तसेच बोटोशी पैकी बेलपाडा आणि मरकटवाडी या पाड्यांमध्ये बिबट्याचा मुक्तसंचार वाढला आहे.

परिसरात बिबट्याने शेतकऱ्यांच्या कोंबड्या फस्त केल्या असून, शेळ्या व गुराढोरांवरही हल्ल्याचा धोका निर्माण झाला आहे.

रात्रीच्या अंधारात बिबट्या रहदारीच्या रस्त्यांवरही बिनदिक्कत वावरत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे वनविभाग सतर्क झाला असून, परिसरात रात्रीची गस्त, ट्रॅप कॅमेऱ्यांद्वारे निगराणी आणि जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे.

सध्या शेतीचा हंगाम सुरू असल्याने शेतकरी दिवस-रात्र शेतात राबत आहेत. अशा परिस्थितीत बिबट्याने शेतकऱ्यांची जनावरे फस्त केल्यास ऐन हंगामात त्यांची मोठी आर्थिक हानी होणार आहे.

अनेक शेतकरी आपली जनावरे बंदिस्त जागेत न बांधता उघड्यावर सोडत असल्याने त्यांच्या जीवितालाही धोका संभवत आहे. त्याचबरोबर संबंधित गावपाड्यांमधील रहदारीच्या रस्त्यांवर प्रकाश व्यवस्था नसल्याने बिबट्याचा वावर आणखी वाढत असल्याचे चित्र आहे.

मोखाडा तालुक्यात बिबट्याने मानवी वस्तीत घुसून हल्ले केल्याच्या यापूर्वीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. १३ फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे एक वाजता कारोळ गावातील वावळ्याची वाडी येथे बिबट्याने ८० वर्षीय वृद्धावर हल्ला केला होता. या हल्ल्यात वृद्धाचे तोंड ओरबडले गेले; ओठ व कपाळावर गंभीर जखमा झाल्या होत्या.

वनविभागाचे आवाहन

वनविभागाकडून नागरिकांना सावधतेचे आवाहन करण्यात आले आहे. बिबट्याचा वावर असलेल्या भागात लहान मुलांना एकटे सोडू नये; शेतात काम करताना चार-पाच माणसांमागे एक माणूस हातात काठी घेऊन उभा राहावा; जनावरे बंदिस्त जागेत बांधावीत.

बिबट्या दिसल्यास किंवा त्याच्या हालचाली आढळल्यास तत्काळ वनविभागाशी संपर्क साधावा. सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही वनविभागाने केले आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT