

भाईंदर: मौजे वरसावे येथील सर्वे क्रमांक ३४ पैकी १ ही जागा पर्यावरणीय अतिसंवेदनशील क्षेत्रात येत असताना डोंगराचे विनापरवानगी खोदकाम केल्याच्या आरोपावरून मेसर्स सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रक्शन कंपनीची चौकशी करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी वनविभागाला दिले आहेत. या कंपनीशी भाजप आमदार नरेंद्र मेहता संबंधित असल्याचे सरनाईक यांनी म्हटले आहे.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा तसेच कारणे दाखवा नोटीस बजावूनही ठोस कारवाई होत नसल्याबद्दल सरनाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
वनविभागाच्या अहवालानुसार हे खोदकाम बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार संबंधित जागा पर्यावरणीय अतिसंवेदनशील क्षेत्रात येत असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.
वनहद्दीपासून अवघ्या १०० मीटर अंतरावर आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संरक्षित भिंतीपासून केवळ २० ते २५ मीटर अंतरावर पोकलेन व जेसीबीच्या सहाय्याने डोंगराचे खोदकाम करण्यात आल्याचा आरोप आहे.
पर्यावरण संनियंत्रण समिती किंवा वनविभागाची पूर्वपरवानगी न घेता पोहोच रस्त्याचे काम सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे. प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला आणि कंपनीसह जागामालकाला कारणे दाखवा नोटीस बजावली.
हा प्रकार पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ तसेच वनकायद्यांचे उल्लंघन असल्याचे वन अधिकाऱ्यांच्या अहवालात नमूद असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, जागामालक वेलकर आणि सेव्हन इलेव्हन कंपनीने वनविभागाला दिलेल्या खुलाशात पावसाच्या पाण्याचा निचरा तसेच रस्त्यासाठी खोदकाम करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले असून, तेथे कोणतेही विकासकाम सुरू नसल्याचा दावा केला आहे.
कागदी घोडे नाचविणे बंद करा!
विकासाच्या नावाखाली पर्यावरणीय नियमांना हरताळ फासण्याचा अधिकार कोणालाही नाही. जमीन खासगी असली तरी पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रातील नियमांचे पालन बंधनकारक आहे. बड्या विकासकांनी नियम धाब्यावर बसवून डोंगर फोडले किंवा निसर्गाचा ऱ्हास केला तर ते सहन केले जाणार नाही, वनविभागाने कागदी घोडे नाचविणे बंद करून संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत आणि यंत्रसामुग्री जप्त करावी, अशा स्पष्ट सूचनाही सरनाईक यांनी दिल्या आहेत.