Mokhada 42 Workers Protest
दीपक गायकवाड
खोडाळा : मोखाडा तालुक्यातील 28 ग्रामपंचायत क्षेत्रात कार्यरत असलेल्या 42 रोजगार सेवकांना माहे डिसेंबर 2024-25 या आर्थिक वर्षापासून आजतागायत तब्बल 5 महिन्यांचे मानधनच अदा करण्यात आलेले नाही. परिणामी रोजगार सेवकांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. परिणामस्वरुप 42 रोजगार सेवकांनी बुधवार दिनांक 5 ऑगस्ट पासून संपाचे हत्यार उपसले असून नरेगाचे काम थांबवले आहे. त्यामूळे नरेगाशी निगडीत सर्व विभागांच्या रोहयोच्या कामांना प्रदीर्घ खिळ बसणार असून त्याचे दुरगामी परिणाम मात्र मजूरांच्या कुटूंबाला आणि बालबच्च्यांना भोगावे लागणार आहेत.
सन 2006 पासून रोजगार सेवक नरेगाचे काम प्रामाणिकपणे करत आहेत.सातत्याने मानधन प्रलंबित रहात असल्याने कौटुंबिक वातावरण ढवळून निघत असून अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचे रोजगार सेवक सांगत आहेत. माहे डिसेंबर पासून आजतागायत सलग 5 महिने मानधन मिळाले नसल्याने केवळ नाविलाजास्तव संप करावा लागत असल्याने शासनाने तातडीने दखल घेऊन आमचे मानधन एकरकमी अदा करावे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्याशिवाय 2 वर्षापासुनचा प्रवास व अल्पोपहार भत्ता त्वरीत देन्यात यावा, नवीन शासन निर्णया नुसार मानधन देन्यात यावे आदि मागण्यांचे निवेदन तालुक्यातील रोजगार सेवकांनी वरिष्ठांना सादर केले आहे.
तालुक्यातील मजुरांची मजूरी थोडीबहुत वगळता जवळपास अदा करण्यात आलेली आहे.तथापी नरेगा योजनेचा कणा असलेल्या रोजगार सेवकांनी प्रामाणिकपणे काम करुन देखील त्यांना मागील 5 महिन्यांपासून एक छदामही देण्यात आलेला नाही.त्यामूळे एकूणच रोजगार सेवकांनी योजनेकडे पाठ फिरवली असल्याने मजुरी मिळेल तेव्हा मिळेल पण कामाच्या आशेवर कुटूंब कबिल्यासह तालुक्यातच तग धरून राहिलेल्या मजुर वर्गाच्या हाताला काम मिळणे दुरापास्त होणार आहे.त्यामुळे शासनाने रोजगार सेवक आणि पर्यायाने मजुरांच्याही योघगक्षेमाचा तातडीने विचार करून मानधन अदा करण्याबाबत उपाययोजना करावी अशी मागणी सर्वच थरातून केली जात आहे.
तब्बल 6 महिने इतकी प्रदीर्घकाळ मानधनाची प्रतिक्षा करावी लागत असल्याने आम्ही कुटूंबांचा चरितार्थ चालवण्यासाठी अक्षरशः स्रीधनही गहाण ठेवले आहे.त्यात आमचे बारीक - सारीक कर्जाचे हफ्ते थकले असून अत्यंत हलाखीत लाजिरवाणे जीवन जगावे लागत असल्याने आत्ता आमचा कणाच मोडून पडण्याची वेळ आली असल्याने मायबाप शासनाने आत्ता तरी आमचे थकीत मानधन अदा करावे.भगवान कचरे तालुका उपाध्यक्ष तथा रोजगार सेवक, मोखाडा