

पालघर ः मोठा गाजावाजा करत पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या मनोर मधील तालुका स्तरीय घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प तीन महिन्यांनी सुरु झालेला नाही.पालकमंत्री गणेश नाईक यमच्या ‘प्लास्टिकमुक्त पालघर जिल्हा’ संकल्पनेला जिल्हा परिषद प्रशासनाच्या वेळकाढू आणि ढिसाळ धोरणामुळे हरताळ फसला जात आहे. घनकचरा प्रकल्पा अभावी पालघर तालुक्यातील कचर्याची समस्या अधिकच गंभीर बनत चालली आहे.
एप्रिल महिन्यात पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते तालुकास्तरीय घनकचरा प्रकल्पाचे उद्घाटन पार पडले होते.तीन महिने पूर्ण झाल्यानंतरही प्रकल्प कार्यान्वित झालेला नाही.प्रकल्प सुरु केल्यानंतर प्रकल्पाचे व्यवस्थापन मनोर ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित केला जाणार होता.
पालघर तालुक्यातील 133 ग्रामपंचायतींमधून दररोज निर्माण होणार्या कचर्यावर प्रक्रिया करण्याच्या हेतूने प्रकल्प उभारण्यात आला आहे. प्लास्टिकचा पुनर्वापर,ओल्या कचर्यापासून खतनिर्मिती आणि ग्रामस्तरावर कचरा व्यवस्थापन यासारखी उद्दिष्टे यामागे होती. ग्रामीण भागात पर्यावरणपूरक पद्धतीने कचर्याच्या विल्हेवाटीचा पर्याय उपलब्ध होणार होता, परंतु प्रकल्प सुरूच न झाल्याने घनकचर्याच्या व्यवस्थापन कागदावरच राहिले आहे.
घनकचरा प्रकल्प बंद असल्यामुळे ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात निर्माण होणारा कचर्याची उघड्यावर विल्हेवाट लावली जात आहे. उघड्यावर टाकलेल्या कचर्यामुळे सार्वजनिक आरोग्यासह आणि पर्यावरणावर गंभीर परिणाम होऊ लागले आहेत.पावसाळ्यात कचर्याची परिस्थिती अधिक गंभीर होते.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठया प्रमाणात शहरीकरण झालेल्या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापना बाबत उदासीनतेचा नमुना असेल, तर भविष्यात ‘स्वच्छ भारत’ ही संकल्पना जुमलेबाजी ठरण्याची शक्यता अधिक आहे.ग्रामीण भागातील कचर्याची समस्या गंभीर होण्याचा धोका पर्यावरण वाद्यांनी व्यक्त केला आहे.
पालघर जिल्हा कचरा मुक्त करण्याच्या उद्देशाने पालकमंत्र्यांनी प्लास्टिकमुक्त पालघर जिल्हा संकल्पना राबवण्याचे आदेश जिल्हा परिषद प्रशासनाला दिले होते. परंतु प्रकल्प सुरु करण्यात होत असलेला विलंब जिल्हा परिषद प्रशासनाचे अपयश अधोरेखित करत आहे.उद्घाटनाच्या तीन महिन्यांनंतरही प्रकल्प सुरु करण्यात अपयश आल्याने पालकमंत्र्यांच्या संकल्पनेला जिल्हा परिषद प्रशासना कडून हरताळ फसला जात आहे.
मनोर येथील घनकचरा प्रकल्प पाणीपुरवठा विभागाच्या उप अभियंत्यांच्या ताब्यात आहे. प्रकल्प मनोर ग्रामपंचायतीकडे हस्तांतर करण्याची प्रक्रिया सुरु आहे.ग्रामपंचायतीने प्रकल्प ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करावी.प्रकल्प उभारणीत असलेल्या त्रुटी दूर करून दिल्या जातील.
अतुल पारसकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्वच्छता विभाग, जिल्हा परिषद पालघर