

पालघर : प्रादेशिक विकास आणि दळणवळणासाठी वाढवण महामार्गावर आणखीन दोन स्वतंत्र मार्गिका उभारण्याचा निर्णय वाढवण पोर्ट प्रोजेक्ट लिमिटेड मार्फत घेण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिकांना या मार्गावरून प्रवास करणे सुलभ होणार आहे. हरित वाढवण बंदराच्या संचालक मंडळामध्ये या सेवा मार्गिकेच्या उभरणीची घोषणा केली गेली. बैठकीमध्ये रस्ते, पायाभूत सुविधांच्या विकासाच्या कामाचा आढावा घेतला गेला.
वाढवण बंदर उभारणीच्या पार्श्वभूमीवर अनेक जोड मार्ग व इतर पायाभूत सुविधा प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. दळणवळण लक्षात घेऊन बंदराला जोडणारे अनेक मार्ग उभारण्याची घोषणा सरकारने केली आहे. वाढवण महामार्ग क्रमांक 248 एस हा त्यातील एक प्रमुक राष्ट्रीय महामार्ग आहे. वाढवण वरोर ते वाणगाव डीएफसी असा रेल्वे व रस्ते 180 मीटरच्या जवळपासचा आहे. तर वाणगाव पासून पुढे तवा पर्यंतचा मार्ग 160 मीटरच्या जवळपासचा राहणार आहे. त्यासाठी महामार्ग प्राधिकरण, भूमीअभिलेख व इतर प्रशासन यंत्रणांनी सर्वेक्षणही पूर्ण केले आहे.
वाढवण महामार्ग हा मुंबई अहमदाबाद महामार्गाला थेट तवा येथे तर मुंबई-वडोदरा एक्सप्रेसवेला चिंचारी येथे जोडला जाणार आहे. हा महामार्ग आठ पदरी आहे. कार्गो, कंटेनर, मालवाहतूक अशी मोठी वाहतूक या मार्गावरून केली जाणार आहे. त्यामुळे हा रस्ता नेहमी अवजड वाहनानी गजबजलेला राहणार आहे. असे असताना स्थानिकाना या रस्त्यावरून प्रवास करणे अवघड होणारे होते. त्याकरता दोन स्वतंत्र सेवा रस्त्यांचा प्रस्ताव बंदराच्या संचालक मंडलासमोर मांडला गेला. अखेर त्या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळाला असून त्यांच्या उभरणीचा मार्ग मोकळा झाला.
नव्याने मंजूर झालेल्या दोन मार्गीकेमुळे स्थानिक नागरिकांनाही तो खुला असणार असून त्यामुळे परिसरातील सध्याची वाहतूक सुलभ होणार आहे. स्थानिक नागरिकांच्या मागण्या व सूचनांचा विचार करून या योजनेत अंडरपास, क्रॉस पैसेज, उड्डाणपूल, उड्डाणपूल आणि सेवा रस्ते यांचा समावेश केला जाणार आहे. हा संपूर्ण रस्ता स्थानिक रहिवाशांसाठी टोलमुक्त असणार आहे. हे रस्ते वाढवण आणि परिसरातील नागरिकांना सुधारित संपर्क सुविधां उपलब्ध करून देणारे आहेत. त्यामुळे दळणवळण यासह शिक्षण व आरोग्यसेवा अधिक सुलभ होतील. नव्या उपजीविकेच्या संधीही यामुळे उपलब्ध होतील.
नव्याने उभारण्यात येणार्या रस्ते टोलमुक्त असेल. हे सेवा रस्ते स्थानिक व्यापार आणि सामाजिक-आर्थिक प्रगतीसाठी महत्वपूर्ण भूमिका निभावणार आहेत. स्थानिक नागरिकांच्या गरजा ओळखून पूर्वी असलेल्या महामार्गात हे महत्वपूर्ण बदल बंदर प्रकल्पामर्फत करण्यात आले आहेत.
जागतिक दर्जाचे पर्यावरणपुरक हरित बंदर उभारणे हे आमचे उद्दिष्ट आहेच, पण त्याचबरोबर या प्रकल्पाच्या वाढीचा सकारात्मक परिणाम परिसरातील स्थानिक समुदायांवरही व्हावा, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
उन्मेष शरद वाघ, अध्यक्ष, जेएनपीए व व्यवस्थापकीय संचालक,वाढवण पोर्ट प्रोजेक्ट लिमिटेड