CRS Portal Mokhada Pudhari
पालघर

CRS Portal Mokhada: मोखाड्यात जन्म-मृत्यू दाखल्यांचे काम ठप्प! सीआरएस पोर्टल ९५ टक्के बंद असल्याने नागरिकांची धावपळ

ग्रामपंचायत निबंधकांनी अपडेट केलेल्या प्रोफाईलला जिल्हा निबंधकांचे अप्रुव्हल मिळत नसल्याचा दावा; तातडीने मंजुरीची मागणी

पुढारी वृत्तसेवा

दिपक गायकवाड

खोडाळा: जन्म व मृत्यूचे ऑनलाईन दाखले देणारे शासनाचे एकमेव अधिकृत सीआरएस (Civil Registration System) पोर्टल मोखाडा तालुक्यात जवळपास ९५ टक्के बंद अवस्थेत आहे. ग्रामपंचायत निबंधक (जन्म-मृत्यू) यांनी पोर्टलवर अपडेट केलेल्या प्रोफाईलला जिल्हा निबंधक (जन्म-मृत्यू), पालघर यांचे अप्रुव्हल मिळत नाही.

त्यामूळे मोखाडा तालुक्यातील आदिवासी बांधवांना अनेक अडचणींशी सामना करावा लागत असून शासकीय योजनांना पारखे राहावे लागत आहे. ग्रामपंचायत निबंधक (जन्म-मृत्यू) यांच्या सीआरएस पोर्टलवरील अपडेट केलेल्या प्रोफाईल जिल्हा निबंधकांनी तातडीने अप्रुव्ह करून द्याव्यात, अशी जोरदार मागणी तालुक्यातून होत आहे.

मोखाडा तालुक्यातील एकूणच समस्यांबाबत ग्रामपंचायतींनी so.palghar01@gmail.com या ईमेलवर पत्रव्यवहार केला आहे तसेच सीआरएस पोर्टल ऑपरेटर व निबंधकांनी कॉल आणि मेसेजद्वारे संपर्क साधला आहे. मात्र, अद्याप या समस्येवर तोडगा निघालेला नाही.

मोखाडा तालुका हा पालघर जिल्ह्यातील डोंगराळ व आदिवासीबहुल तालुका असून दुर्गम वाड्या-वस्त्या, अपुरी दळणवळण साधने, पावसाळ्यात खंडित होणारे रस्ते आणि कमी साक्षरता यामुळे नागरिकांना ऑनलाईन प्रक्रिया ग्रामपंचायत व ऑपरेटरवर अवलंबून कराव्या लागतात; भात, नागली, वरई या पारंपरिक शेती व मजुरीवर आधारित अर्थव्यवस्थेत शाश्वत उत्पन्नाची साधने मर्यादित असल्याने शासकीय अर्थसहाय्य, पेन्शन, पीकविमा व शेती अनुदान योजनाच अनेक कुटुंबांचा आधार ठरतात आणि दाखल्याअभावी या योजना थांबल्यास उपजीविकेवर थेट परिणाम होतो.

जन्म दाखल्याविना आधारकार्ड न निघल्याने विद्यार्थ्यांना शाळा प्रवेश, शिष्यवृत्ती व शैक्षणिक योजनांचा लाभ मिळत नाही, पटनोंदणी अडचणीत येऊन पटसंख्या घटत आहे आणि पटसंख्या कमी झाल्याने शिक्षक अतिरिक्त ठरत असल्याने शाळा व्यवस्थापन व शैक्षणिक गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत आहे.

तर मृत्यू दाखल्याअभावी विधवा महिलांना अर्थसहाय्य व विधवा पेन्शन, तर वारसांना सातबारावर नाव चढविणे शक्य होत नसल्याने शेतीविषयक योजना, पीकविमा व कर्ज प्रकरणे रखडली आहेत.

विद्यार्थ्यांचे आधारकार्ड ऑनलाईन नसल्यामुळे संच मान्यतेला बाधा आल्याने विद्यार्थी वगळले जाऊन शिक्षकांची संख्या कमी होते व त्याचा दुरगामी परिणाम शैक्षणिक कार्यप्रणालीवर नव्हे तर शाळेवर होतो.
- विनोद नागोराव करपे , मुख्याध्यापक , जिल्हा परिषद केंद्र शाळा, किनिस्ते
आधार ऑथेंटिकेशन मुळे नागरी नोंदणी प्रणालीवर कमालीचा भार पडत आहे.तसेच इंटरनेटच्या व्यस्ततेमुळे देखील पोर्टलवर नोंदणी करणे दुरापास्त होत आहे.याबाबत राज्याचे उपसंचालक यांच्याशी पत्रव्यवहार केला असून लवकरच त्याबाबत मार्ग निघेल ‌
- वसंत भवारी, जिल्हा निबंधक - सी आर एस् जि. प. पालघर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT