मनोर - वाडा - भिवंडी महामार्गावर अर्धवट कामांमुळे पावसाळा संकटाचा  pudhari photo
पालघर

Palghar News : मनोर - वाडा - भिवंडी महामार्गावर अर्धवट कामांमुळे पावसाळा संकटाचा

वन विभागाच्या हद्दीत ठोस तोडगा नसल्याने फरपट

पुढारी वृत्तसेवा

वाडा : मच्छिंद्र आगिवले

एक महामार्ग जो तब्बल 15 वर्षांपासून कोट्यवधींचा निधी खर्चूनही आपल्या अपूर्ण कामांमुळे वाहनचालकांसाठी कर्दनकाळ बनलेला आहे अशी राज्यातील दुर्मिळ घटना असावी. तीन आमदार, दोन खासदार लाभलेले असतानाही जनता डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार घेऊन प्रवास करणे हे दुर्दैवी आहे. 800 कोटींचे काँक्रीटीकरण दोन वर्षांपासून कासवगतीने सुरू असून अजूनही अंतर्गत समस्यांमुळे जनता त्रस्त आहे व सरकार बघ्याची भूमिका घेत आहे ही संतापाची बाब आहे.

मनोर जवळील टेननाका ते वाडा, वाडा ते डाकीवलीफाटा व अंबाडी ते भिवंडी या जवळपास 55 किमी. मार्गाचे काँक्रीटीकरण ईगल इन्फ्रा. या कंपनीला देण्यात आले आहे. दोन वर्षे उलटूनही रस्त्याची बहुतांश कामे अपूर्ण असून तीन टप्प्यात सुरू असणाऱ्या महामार्गाच्या कामात जागोजागी खोदकाम करून जैसे थे सोडण्यात आली आहेत.

डाकीवली फाटा ते वाडा या 20 किमी. अंतरात 8 किमी दुतर्फा तर 9 किमी. एकेरी मार्गाचे काम पूर्ण झाल्याचा अधिकाऱ्यांचा दावा आहे. वाडा ते टेननाका या 23 किमी दरम्यान 7 किमी एकेरी काँक्रीटीकरण पूर्ण असून पावसाळ्याच्या आधी हे काम 10 किमी पूर्ण होईल असा अधिकाऱ्यांना विश्वास आहे.

देहर्जे व पिंजाळ या दोन नद्यांवरील अपूर्ण पूल पूर्ण करण्यासाठी बांधकाम विभाग अग्रेसर आहे मात्र वन विभागाच्या मनोर येथील अधिकाऱ्यांनी नाहक आडकाठी केल्याचे पीडब्लूडी अधिकारी सांगतात. आधीच नाजूक असणाऱ्या या दोन्ही पुलांवरून अवजड वाहतूक धावत असते. पुलांना बाधा निर्माण झाली तर याला जबाबदार कोण असा सवाल विचारला जात असून वनविभागाला सामाजिक जाणीव नाही का असा सवाल विचारला जात आहे.

55 किमीच्या एकूण मार्गात 10 किमी क्षेत्र वनविभागाचे असून या दरम्यान रस्त्याची अवस्था सध्या बिकट आहे. वन विभागाने 7 मीटर रुंद काँक्रीटीकरणाला परवानगी दिल्याने वनहद्दीत काहीजागी काम सुरू आहे मात्र भू संपादनाचा प्रस्ताव नव्याने सादर करण्यात आल्याचे उप अभियंता अजय जाधव यांनी सांगितले. महामार्गावर जागोजागी खोदकाम करून कंत्राटदार जणू लंपास झाले आहेत, गटारांची अवस्था काहीजागी निकृष्ट असून पावसाळा तोंडावर आला मात्र अजूनही महामार्गावर कंपनीने कुठेही डांबरीकरण हाती घेतले नाही.

सूचना फलक, सुरक्षा यंत्रणा, तक्रारनिवारण व देखरेख यात कंत्राटदार दुर्लक्ष करीत असून केवळ काम ढकलण्याचा प्रकार असू असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. वन विभागासह बांधकाम विभागाचे अधिकारी व कंत्राटदारी मनमानी करून महत्वाच्या कामांमध्येही खो घालीत असून सुरक्षेच्या बाबतीत कंपनी कानाडोळा करीत आहे.

लोकप्रतिनिधी केवळ स्टंटबाजी करीत असून सत्ताधारी व विरोधक केवळ राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत करीत आहेत असे लोकांचे म्हणणे आहे. आमदार व खासदार महामार्गाच्या बाबतीत कधी गंभीर होणार असा सवाल विचारला जात असून महामार्ग सुकर व्हावा हीच अपेक्षा व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT