Accident News Pudhari
पालघर

Accident News: मनोर-वाडा भिवंडी महामार्ग ठरतोय धोकादायक, ४ वाहनांचा विचित्र अपघात

मनोरच्या दिशेला आमगाव गावाजवळ मंगळवारी बेशिस्त वाहनचालकामुळे झालेल्या विचित्र अपघातात चार वाहने अपघातग्रस्त झाली आहेत.

पुढारी वृत्तसेवा

वाडा: मनोर - वाडा - भिवंडी महामार्गाचे काँक्रीटीकरण व चौपदरीकरण अतिशय कासवगतीने सुरू असून जागोजागी अर्धवट सोडलेल्या कामांमुळे हा महामार्ग वाहनचालकांसाठी कर्दनकाळ ठरत आहे.

मनोरच्या दिशेला आमगाव गावाजवळ मंगळवारी बेशिस्त वाहनचालकामुळे झालेल्या विचित्र अपघातात चार वाहने अपघातग्रस्त झाली आहेत. दुचाकीवरील काही व्यक्ती या अपघातात जखमी झाले असून मनोर रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

आमगाव गावाजवळ काँक्रीटीकरणाचा एकेरी टप्पा पूर्ण करण्यात आला असून याच मार्गावरून सुसाट प्रवास करण्याच्या नादात एक कार चालक चुकीच्या दिशेने शिरला. समोरून येणाऱ्या अन्य एका कारसह दोन दुचाकींना या कारने धडक दिल्याने भीषण अपघात घडला.

दुचाकीवरील दोघेजण या अपघातात जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आमगाव सह करलगाव, कंचाड, पोशेरी, पाली अशा भागात काँक्रीटीकरणाचा एकेरी मार्ग बनविण्यात आला असून बेशिस्त वाहनांमुळे अनेकांचा जीव धोक्यात सापडला आहे.

वाडा ते भिवंडी महामार्गावर परिस्थिती अधिक भीषण असून जागोजागी केलेले खोदकाम, मोऱ्यांची व पुलांची अपूर्ण कामे, खराब रस्ता, उडणारी धूळ, सूचना फलकांचा अभाव यामुळे रस्तावर प्रवास करणे म्हणजे जीव मुठीत घेऊन चालण्यासारखे आहे असे वाहनचालक सांगतात.

काही राजकीय नेत्यांनी पिडब्लूडी विभागासह कंपनीच्या भोंगळ कारभारा विरोधात आवाज उठविला असून अपघातात कुणाचाही जीव गेला तर मृतदेह थेट कार्यालयासमोर ठेवू असा इशारा देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT