Arrested Pudhari
पालघर

Manor robbery case: महामार्गावर प्रवाशाला कारमध्ये डांबून लूटणाऱ्यांना अटक

बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशाला केले लक्ष, सात जणांविरोधात गुन्हा, सावधगिरी बाळगण्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

पालघर: मुंबई अहमदाबाद महामार्गावर गुजरातला जाण्यासाठी लक्झरी बसची वाट पाहत उभ्या असलेल्या एका प्रवाशाला कारमध्ये डांबून मारहाण करत लुटणाऱ्या टोळीला अटक करण्यात मनोर पोलिसांना यश आले आहे.

सात पैकी पाच आरोपीना बोईसर परिसरातून अटक करण्यात आली आहे. आठवडा भरापूर्वी गुजरातला जाण्यासाठी महामार्गावर उभ्या प्रवशाला सात अनोळखी इसमांनी कारमध्ये जबरदस्तीने बसवून मारहाण करून लुटले होते. याप्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आठवडा भरापूर्वी पहाटेच्या सुमारास फिर्यादी कल्पेश पटेल गुजरात राज्यात जाण्यासाठी मुंबई अहमदाबाद महामार्गावर आवंढाणी गावाच्या हद्दीत लक्झरी बसची वाट पाहत उभा असताना गुजरातच्या दिशेने जाणारी कार त्यांच्या जवळ थांबली, कार मध्ये सात प्रवाशी होते, त्यांनी कार घेऊन राजस्थान येथे जात असल्याचे सांगून फिर्यादीला कारमध्ये बसवले.

बसल्यानंतर लगेच आरोपींनी फिर्यादीकडून शंभर रुपये ऑनलाइन भाडे घेतले. त्यानंतर कार मनोर परिसरात पोहचल्यानंतर पुन्हा पैशांची मागणी केली. यावेळी आरोपींनी फिर्यादीच्या मोबाईलमधील गुगल पे च्या माध्यमातून शंभर रुपये घेतले.फिर्यादीला संशय आल्याने गुगल पे ऍप डिलीट करण्याचा प्रयत्न केला असता कार मधील आरोपीनी फिर्यादीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला.

कारमध्ये डांबून ठेवत मारहाण केली. त्यानंतर जीवे मारण्याची धमकी देत त्याच्याकडून गुगल पेचा गोपनीय पिन माहित करून घेतला.त्यानंतर मुंबई- अहमदाबाद महामार्गावरील मेंढवण खिंडीतील चढणीच्या भागात कारमधून खाली उतरवले आणि आरोपी कार मधून गुजरातच्या दिशेने पसार झाले.

त्यानंतरच्या दोन दिवसांच्या कालावधीत आरोपींनी फिर्यादीच्या मोबाईलमधील गुगल पेच्या माध्यमातून बँक खात्यातून सुमारे एक लाख रुपये ऑनलाइन काढल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी फिर्यादीने मनोर पोलीस ठाण्यात सात अनोळखी इसमांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमां अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मनोर पोलिसांनी तांत्रिक बाबी आणि कौशल्यपूर्ण तपास करून बोईसर परिसरातून पाच आरोपींना अटक करण्यात यश आले आहे.

दरम्यान महामार्गावर प्रवास करताना अनोळखी वाहनांमध्ये लिफ्ट घेणे किंवा भाड्याच्या नावाखाली प्रवास करण्यापूर्वी नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT