Mumbra Kalwa SIR: एसआयआरमध्ये मुंब्रा-कळव्यातील 2 लाख मतदारांची नावे कापली

एसआयआरच्या माध्यमातून विरोधातील प्रबळ नेतृत्व संपवण्याचा डाव : डाॅ. जितेंद्र आव्हाड
voter verification
voter verificationPudhari
Published on
Updated on

ठाणे: एसआयआरच्या माध्यमातून विरोधातील प्रबळ नेतृत्व संपविण्याचे षडयंत्र रचले जात आहे. जे प.बंगालमध्ये, जे तमीळनाडूमध्ये घडविले ते आपल्याकडेही घडविले जात आहे. अगदी कळवा, मुंब्रा भागातही दोन लाख मते कापण्यात आली आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते आ. डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी केला.

मुंब्रा येथे राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते समीर शमीम खान यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते तथा जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या उपस्थितीत पार पडले. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत डाॅ.जितेंद्र आव्हाड बोलत होते.

डाॅ. आव्हाड म्हणाले की, ममता बॅनर्जी यांचा पराभव होईल, अशी स्थिती कधीच नव्हती. त्यांच्या पक्षाचा पराभव जेवढ्या मतांनी झाला आहे. तेवढीच मते एसआयआरमध्ये कापण्यात आली होती, हे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे, निवडणूक आयोगाने ही नावे चुकून कापली आहेत, असे स्पष्टीकरणही दिले आहे.

तमीळनाडूमध्ये स्टॅलिन कसा काय पराभूत होऊ शकतो? स्टॅलिन फक्त १५०० मतांनी हरले. ममता बॅनर्जी आणि स्टॅलिन हे दोघेही माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांना षडयंत्र करून हरविण्यात आलू आहे.

भाजप आणि त्यांचे जे मित्रपक्ष आहेत, त्यांचेच हे षडयंत्र आहे. जो कोण मजबूत उमेदवार असेल, त्या उमेदवाराची एसआयआरच्या माध्यमातून मते कापा आणि त्यांना पाडा, हेच धोरण आखण्यात आले आहे.

म्हणूनच आपण आवाहन करतो की, झेन झी म्हणजे ज्यांनी वयाची ३० वर्षे ओलांडलेली नाहीत आणि ३० वर्षांच्या आत आहेत आणि जे तरुण १८ च्या वर गेले आहेत, त्यांनी येत्या काही दिवसांत फॉर्म नंबर सहा भरावेत अन् मतदार व्हावे.

आपल्याला कोणाचेही भय बाळगण्याचे कारण नाही. पण मत नोंदणी करणे ही आपल्या पक्ष संघटनेची जबाबदारी आहे. संघटनेने जबाबदारीने तरुणांपर्यंत पोहोचून काम केले पाहिजे. निवडणुकीला आता अडीच वर्षे बाकी आहेत, मात्र, निवडणूक लवकरही घेऊ शकतात, कधीही घेऊ शकतात. यांचा काही भरवसा नाही. निवडणूक कधीही येऊ दे, पण आपली तयारी आजपासून सुरू झाली पाहिजे, असेही डाॅ.जितेंद्र आव्हाड म्हणाले.

समीर खान यांना सल्ला देताना, लोकांच्या मदतीसाठी हे कार्यालये २४ तास उघडे असले पाहिजे. रेशन कार्ड असो, हॉस्पिटलची कोणतीही समस्या असो, घरातील कोणतीही समस्या असो, त्यांचे निराकरण आपण केलेच पाहिजे. आपले कार्यकर्ते घराघरांपर्यंत पोहोचले पाहिजेत, हेच संघटनेचे काम आहे, असे डाॅ. आव्हाड म्हणाले.

दरम्यान, मनोज प्रधान यांनी, प्रभाग क्रमांक ३३ मध्ये समीर खान यांच्या कार्यालयाचे उद्घाटन झाले आहे. आज जे या कार्यालयाचे उद्घाटन समीर खान करत आहेत. निवडणुका नसताना कार्यालयाचे उद्घाटन होत आहे, उल्लेखनीय आहे.

म्हणूनच साडेचार वर्षांनंतर जी निवडणूक होणार आहे, त्यात विजयाचे एक माध्यम हे कार्यालय ठरणार आहे, मागील निवडणुकीत समीर फक्त दोनशे मतांनी पराभूत झाला आहे. आता त्याला साडेचार वर्षे मिळतील.

तो पुढील निवडणूक कमीत कमी अडीच हजार मतांनी जिंकेल. हे कार्यालय जे आहे, ते लोकांमध्ये आणि त्यांच्या कामांमधला एक दुवा आहे, तिथे तुमची एक ठरलेली वेळ असली पाहिजे, जर अकरा वाजता तर अकरा वाजता, बारा वाजता तर बारा वाजता, लोकांना हे कळले पाहिजे की या वेळेत जर आम्ही आलो, तर समीर आम्हाला तिथे भेटेल.

इथे प्रत्येक माणसाला आपली समस्या सुटेल, याची खात्री वाटली पाहिजे, असे काम करा, असे म्हटले. या वेळी कळवा-मुंब्रा विधानसभाध्यक्ष शमीम खान, विरोधी पक्ष नेते शानू पठाण, ऋता आव्हाड, अल्पसंख्याक सेलचे ठाणे अध्यक्ष मुफ्ती, नगरसेवक यासीन कुरैशी, सूधीर भगत, मर्जिया पठाण, दिपाली भगत, मनिषा भगत, भूषण गोटे, पल्लवी जगताप, शाकीर शेख, सीमा दाते आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news