

विक्रम बाबर
पनवेल: शासनाच्या एसआयआर कार्यक्रमानुसार दुसऱ्या टप्प्यातील यादी अंतिम करण्याची प्रक्रिया १ सप्टेंबरपासून सुरू होत असतानाच पनवेल महानगरपालिकेच्या प्रशासकीय, लेखा व लेखा परीक्षण संवर्गातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची विभागीय परीक्षा गणपती महोत्सवाच्या कालावधीत घेण्याचे नियोजन करण्यात आल्याने प्रशासनाच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
विशेष म्हणजे, तब्बल १२९ अधिकारी-कर्मचाऱ्यांना या परीक्षेला सामोरे जावे लागणार असल्याने प्रशिक्षणार्थ्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे.
पनवेल महानगरपालिकेच्या सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण नियम २०२२ तसेच कर्मचाऱ्यांसाठीच्या अर्हताकारी विभागीय परीक्षा नियम २०२२ नुसार संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना आवश्यक विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. त्यासाठी महापालिकेमार्फत ४० तासांचे प्रशिक्षणही आयोजित करण्यात आले होते.
महापालिकेने ६ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या कार्यालयीन आदेशानुसार १९, २० आणि २१ ऑगस्ट रोजी विविध प्रश्नपत्रिकांचे प्रशिक्षण घेण्यात आले. प्रशिक्षणाला उपस्थित राहणे अनिवार्य असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले होते. प्रशिक्षण सुरू होण्यापूर्वी तसेच प्रशिक्षण समाप्तीनंतर अशा दोन वेळा हजेरी घेण्याची तरतूदही करण्यात आली होती.
प्रशिक्षणादरम्यान हजेरी नोंदवून प्रत्यक्ष प्रशिक्षणास उपस्थित नसल्याचे आढळल्यास संबंधितांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा महापालिकेने दिला आहे. मात्र, यापूर्वीच्या प्रशिक्षणावेळीही ‘फ्रॉझी हजेरी’बाबत चर्चा झाल्याचे पालिका वर्तुळात बोलले जात होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून व्हॉट्सअॅप ग्रुपवर उपस्थितीबाबत कडक संदेश देण्यात आल्याचीही चर्चा होती.
आता नुकत्याच झालेल्या प्रशिक्षणातही नियमांचे उल्लंघन करून काही अधिकारी-कर्मचारी प्रत्यक्ष प्रशिक्षणास उपस्थित होते का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे ४० तासांचे अनिवार्य प्रशिक्षण पूर्ण न करणाऱ्या अथवा उपस्थितीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना विभागीय परीक्षेला बसता येणार का? असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे.
नियम सर्वांसाठी समान असतील का?
विभागीय परीक्षा ही सेवा नियमांनुसार अनिवार्य असल्याने तिच्या आयोजनाला विरोध नसल्याचेही काही कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र परीक्षेपूर्वी ४० तासांचे प्रशिक्षण अनिवार्य असेल, हजेरी दोन वेळा घेण्यात येणार असेल आणि गैरहजेरीबद्दल शिस्तभंगाची कारवाई होणार असेल, तर हे सर्व नियम प्रत्यक्षात किती काटेकोरपणे राबविले गेले याची तपासणी होणे आवश्यक आहे, अशी मागणी होत आहे.
एसआयआरच्या कामाचा वाढता ताण, गणपती महोत्सवाचा कालावधी, १२९ अधिकारी-कर्मचाऱ्यांची परीक्षा, ४० तासांच्या प्रशिक्षणाची अट आणि पूर्वीपासून चर्चेत असलेला हजेरीचा मुद्दा यामुळे पनवेल महापालिकेची विभागीय परीक्षा आता केवळ परीक्षा न राहता प्रशासनाच्या पारदर्शकतेचीही ‘अग्निपरीक्षा’ ठरण्याची शक्यता आहे.
प्रशासनाने परीक्षा नेमकी कोणत्या तारखेला घेणार, ४० तासांचे प्रशिक्षण पूर्ण केल्याची खातरजमा कशी केली जाणार, प्रशिक्षणातील उपस्थितीची पडताळणी होणार का आणि सर्व १२९ अधिकारी-कर्मचाऱ्यांना समान निकष लागू केले जाणार का, याबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करणे आवश्यक आहे.