पालघर : पालघर सिन्नर महामार्गाच्या रुंदीकरणा अंतर्गत मनोर ग्रामपंचायत हद्दीतील प्रस्तावित बायपास मार्गा विरोधात ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत ग्रामपंचायतीला धारेवर धरत बायपास विरोधात ठराव मंजूर केला. विशेष ग्रामसभेत राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंते अनुपस्थित राहिल्याने ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यपद्धतीचा निषेध नोंदवण्यात आला.
22 डिसेंबर रोजी पार पडलेल्या ग्रामसभेत बायपासचा ठराव मंजूर केल्याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाला ग्रामस्थांनी धारेवर धरले होते. मनोर बाजारपेठेतील रस्ता रुंदीकरणात दुकाने तुटण्याची शक्यता असल्यामुळे व्यापाऱ्यांचा विरोध आहे.तर बायपास रस्त्यात घरे आणि जमिनी जाणार असल्यामुळे ग्रामस्थांकडून बायपास रस्त्याला विरोध केला जात आहे.
ग्रामसभे दरम्यान व्यापारी आणि ग्रामस्थांमधील चर्चे दरम्यान वाद होऊन वादाचे रूपांतर हाणामारी पर्यंत गेले होते, परंतु पोलीस आणि ग्रामस्थांनी मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणली.ग्रामसभेच्या अखेरच्या टप्प्यात ग्रामस्थ आणि व्यापाऱ्यांनी सर्वानुमते बायपास रस्त्या विरोधात ठराव मंजूर केला.
पालघर सिन्नर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी राष्ट्रीय महामार्ग अधिनियमा अंतर्गत भुसंपादन प्रक्रिया राबवण्यासाठी केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्रालयाकडून अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.रुंदीकरणासाठी पालघर तालुक्यातील पालघर, नंडोरे, शेलवाली, चहाडे,मासवण,गोवाडे,तामसई,मनोर, नांदगाव, टाकवहाल, सावरखंड,कोसबाड आणि नवी दापचरी गावामधील जमिनींचे संपादन केले जाणार आहे.भुसंपादन प्रक्रियेची माहिती ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभा आयोजित करून दिली जात आहे.
मनोर जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणात आयोजित विशेष ग्रामसभेला ग्रामस्थांनी मोठया संख्येने उपस्थिती लावली होती. गायकवाड डोंगरी, खाजा नगर,पोलीस लाईन डोंगरी गावातील व्यापारी वर्गाने ग्रामसभेत सहभाग नोंदवला. मनोर ग्रामपंचायत हद्दीतील बाजारपेठेतील रस्ता रुंदीकरण तसेच प्रस्तावित बायपास रस्त्याला ग्रामस्थांकडून विरोध करण्यात आला.
आंदोलनाचा इशारा
जबरदस्तीने बायपास रस्त्यासाठी मोजणी अथवा अन्य कोणतीही प्रक्रिया सुरु केल्यास आंदोलन इशारा ग्रामस्थांनी दिला. बायपास रस्त्यात अनेक कुटुंबे बेघर होण्याची शक्यता आहे, तर बाजारपेठेतील रस्त्याचे रुंदीकरण केल्यास व्यापाऱ्यांची दुकानें तुटून बाजारपेठ उद्धस्त होण्याची शक्यता असल्यामुळे रुंदीकरण आणि बयापास रस्त्याला ग्रामस्थांनी विरोध केला.बाजारपेठेतील रस्ता रुंदीकरण तसेच बायपास रस्त्या ऐवजी अन्य पर्याय शोधण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली.