वाडा : वाडा तालुक्यातील कोनसई गावच्या हद्दीत एका फार्महाऊसवर पत्र्याचा शेड बांधून सुतळी बॉम्ब बनविण्याचा अनधिकृत उद्योग सुरू असून मंगळवारी झालेल्या भीषण स्फोटात दोन कामगारांचा मृत्यू झाला होता. जागा मालक, व्यवस्थापक व दोघा मालकांच्या विरोधात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून चौघांनाही अटक करण्यात आली आहे.
उप विभागीय पोलीस अधिकारी जव्हार एस.एस.महेर या गुन्ह्याचा पुढील तपास करीत असून घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पालघर पोलीस अधीक्षक यतीष देशमुख वाडा येथे तळ ठोकून होते. कोनसई गाव मंगळवारी सकाळी एका मोठ्या धमाक्याने हादरून गेला जो याच गावात अनधिकृतपणे सुरू असणाऱ्या दारूगोळ्याच्या स्फोटाने घडला होता.
धमाका इतका मोठा होता की ज्यात भावेश वावरे जागीच ठार झाला तर मोनिका पडवळे या महिला कामगाराचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू झाला.चार ते पाच अन्य महिला कामगार जखमी असून त्यांच्यावर देखील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
कोनसई या गावात हा व्यवसाय पूर्णपणे अवैधरित्या सुरू असून तो विनाप्रशिक्षण व कोणत्याही सुरक्षा साधनांचा वापर न करता जवळपास 35 कामगारांच्या जीवाशी खेळणारा होता हे धक्कादायक आहे.
वाडा पोलिसांनी स्फोटाच्या घटनेनंतर कुडूस गावात राहणारे नरेंद्र सिंह व बन्सी यादव या दोन मालकांसह जागेचे मालक वसंत नाईक व व्यवस्थापक योगेश मोकाशी या चौघांना मंगळवारी रात्री अटक केली असून सदोष मनुष्य वधासह अन्य कलमांच्या अंतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे असे पोलीस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे यांनी सांगितले.