

वाडा: वाडा तालुक्यातील कोनसई गावात एका फार्म हाउसमध्ये अवैधरीत्या फटाके बनविण्याचा उद्योग सुरू होता. मंगळवारी सकाळी 11 च्या सुमारास दारूगोळ्याचा भीषण स्फोट होऊन यात एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला.
गंभीररित्या भाजलेल्या एका कामगार महिलेचाही उपाचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 6 कामगार महिला जखमी झाल्या आहेत. फटाके बनविण्याचा अवैध उद्योग राजरोस सुरू असताना पोलीस यंत्रणा झोपेचे सोंग घेऊन होती का, असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, या घटनेने स्थानिक गावकरी हादरून गेले आहेत. कोनसई गावातील एका व्यक्तीच्या जागेत पोल्ट्रीफार्मप्रमाणे दिसणाऱ्या एका शेडमध्ये सुतळीबॉम्ब बनविण्याचा उद्योग मागील पाच महिन्यांपासून सुरू होता. परिसरातील जवळपास 35 महिला याठिकाणी कामावर येत असून एक
पुरुष कामगार व व्यवस्थापक असा येथे कर्मचारीवर्ग होता. कंपनी पूर्णपणे अवैध पद्धतीने सुरू असल्याचे स्थानिक नागरिक सांगत असून यास ग्रामपंचायतची कोणतीही परवानगी नव्हती, असे सरपंच सांगतात. योगेश मोकाशी नावाच्या व्यवस्थापकांना विचारणा केली असता दोघे मालक मिळून ही कंपनी चालवित असून तिला परवानगी होती की नव्हती याबाबत मला माहिती नाही असे त्यांनी सांगितले.
मंगळवारी 22 महिला कामावर असून एक पुरुष कामगार फटाके उद्योगात वापरला जाणारा दारूगोळा बाजूच्या शेडमध्ये तयार करीत होता.अचानक त्याला काहीतरी संशय वाटल्याने त्याने अन्य महिलांना बाजूला पळण्यास सांगितले मात्र तातडीने या मिश्रणाचा मोठा भीषण स्फोट झाला.
स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की यात कामगार भावेश वावरे (वय 25रा. जामघर) याचा जागीच मृत्यू झाला. शेडचे पत्रे, लोखंड व भावेश याचा छिन्नविच्छिन्न मृतदेह जवळपास 80 मीटर लांब शेतात फेकला गेला.
महिला कामगार दुसऱ्या बाजूला असल्याने सुदैवाने बचावल्या मात्र शेडमध्ये काम करणाऱ्या जवळपास पाच ते सहा महिला कामगार जखमी झाल्या असून ग्रामीण रुग्णालयात उपचार घेणाऱ्या महिलांपैकी एका महिलेची मात्र प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
भावेश हा एकुलता एक घरातील आधारस्तंभ असून त्याचे अवघ्या एका महिन्यात लग्न होणार होते. भावेशच्या अकाली मृत्यूने कुटुंबावर मात्र शोककळा पसरली असून या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.
कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे
वाडा तालुका औद्योगिक झोनमध्ये असला तरी अवैध पद्धतीने सुरू असणारा हा व्यवसाय पोलिसांच्या रडारवर आला कसा नाही असा सवाल ग्रामस्थांमधून विचारला जात आहे. वाडा तालुक्यात असे अन्य उद्योग देखील सुरू असल्याचा स्थानिक ग्रामस्थांचा संशय असून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला जात आहे.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता प्रांत अधिकारी डॉ.संदिप चव्हाण, तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे यांनी घटनेची पाहणी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे लोकांना आश्वासन दिले आहे.