Kelwe Shitladevi Temple pudhari photo
पालघर

Kelwe Shitladevi Temple : पालघरमधील केळवेची शितलादेवी जागृत देवस्थान

नवरात्रौत्सवात होतेय भाविकांची प्रचंड गर्दी

पुढारी वृत्तसेवा

सफाळे : पालघर जिल्ह्याच्या पश्चिम किनारपट्टीवरील निसर्गरम्य केळवे गाव हे सुंदर समुद्रकिनाऱ्यासोबतच जागृत शितलादेवी मंदिरामुळे भाविकांच्या श्रद्धेचे महत्त्वाचे केंद्र बनले आहे. नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असून, देवीच्या मनोहारी सजावटीचे दर्शन घेण्यासाठी परिसरासह दूरवरूनही भक्त केळवे येथे येत आहेत.

आदिमाता शितलादेवी नवसाला पावणारी असून, ती भक्तांच्या जीवनात सुख, शांती आणि समाधानाचा शीतल अनुभव देते, अशी भाविकांची दृढ श्रद्धा आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारून जातो. केळवे गावाला पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्व लाभले आहे. प्रभू श्रीरामचंद्रांनी येथे धनुष्यबाण सोडून निर्माण केलेले पवित्र रामकुंड आजही भाविकांचे श्रद्धास्थान आहे.

महिकावती नगरीतील अही-मही राक्षसांचा वध केल्यानंतर प्रभू श्रीरामांनी ‘कदलीवह’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केळवे परिसराला भेट दिली. रामकुंडात स्नान केल्यानंतर त्यांनी वालुकेश्वराच्या स्वयंभू शिवलिंगाचे पूजन केल्याची आख्यायिका सांगितली जाते. या पवित्र स्थळाचा उल्लेख तुलसीरामायणातील युद्धकांडात असल्याचेही सांगितले जाते.

बगलवाडीत देवीचे वास्तव्य असल्याचा दृष्टांत झाल्यानंतर गावकऱ्यांनी रामकुंडासमोर कौलारू मंदिर उभारून त्यामध्ये शितलादेवीची मूर्ती प्रतिष्ठापित केल्याची आख्यायिका प्रचलित आहे. चारशे वर्षांहून अधिक परंपरा असलेल्या या देवस्थानाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी जीर्णोद्धार केल्याचे सांगितले जाते. कालांतराने मंदिर व परिसराची अवस्था जीर्ण झाल्यानंतर ग्रामस्थांनी एकत्र येऊन मंदिराच्या पुनर्बांधणीचा संकल्प केला. त्यानुसार १० एप्रिल १९८६ रोजी मंदिराचे कलशारोहण करण्यात आले.

पुढे १० मार्च २००१ रोजी गुरुमाऊली वामनराव पै यांच्या हस्ते रामकुंडाच्या सुशोभीकरणाचे लोकार्पण करण्यात आले. शितलादेवी मंदिरात दरवर्षी चैत्र शुद्ध पौर्णिमेला मोठी जत्रा भरते. या जत्रेसाठी महाराष्ट्रासह गुजरात, सौराष्ट्र आणि उत्तर प्रदेश आदी भागांतून हजारो भाविक येतात. त्रिपुरी पौर्णिमेला येथे भव्य दीपोत्सव साजरा केला जातो. हजारो पणत्यांच्या प्रकाशाने मंदिर व परिसर उजळून निघतो. या दीपोत्सवात आसपासच्या गावांतील भाविक मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. नवरात्रोत्सवात देवीच्या मूर्तीची आकर्षक सजावट केली जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT