illegal tobacco transport pudhari photo
पालघर

illegal tobacco transport : चारोटीजवळ लाखोंचा गुटखा-पानमसाला साठा जप्त

कासा पोलिसांची कारवाई; टेम्पोसह आरोपी ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

कासा : महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या सुगंधी तंबाखूजन्य पदार्थांची गुजरातमधून भिवंडीकडे अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर कासा पोलिसांनी कारवाई केली. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील चारोटी टोलनाका परिसरातील घोळ गावाजवळ मंगळवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांचा १९ लाख ८६ हजार १७४ रुपयांचा साठा तसेच सुमारे १० लाख रुपये किमतीचा पिकअप टेम्पो, असा एकूण २९ लाख ८६ हजार १७४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी अस्लम रुस्तम कुरेशी (वय ३६, रा. कामतघर, भाग्यनगर, भिवंडी) याच्याविरुद्ध कासा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १८६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा व मानदे कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-अहमदाबाद महामार्गावर चारोटी टोलनाका, घोळ गाव परिसरात वाहनांची तपासणी सुरू असताना बोलेरो टेम्पोची तपासणी करण्यात आली.

या वाहनामध्ये महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार प्रतिबंधित असलेला सुगंधी पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थ मोठ्या प्रमाणात आढळून आले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये विविध प्रकारचा विमल पानमसाला, केसरयुक्त पानमसाला आणि तंबाखू यांचा समावेश आहे. पोलिसांनी केलेल्या पंचनाम्यानुसार या प्रतिबंधित पदार्थांची एकूण किंमत १९ लाख ८६ हजार १७४ रुपये आहे. याशिवाय सुमारे १० लाख रुपये किमतीचा पिकअप टेम्पो जप्त करण्यात आला. वाहनासह जप्त मुद्देमालाची एकूण किंमत २९ लाख ८६ हजार १७४ रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य अन्न व औषध प्रशासनाच्या अधिसूचनेनुसार जनतेच्या आरोग्याच्या हितासाठी स्वादिष्ट व सुगंधित तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ आणि अन्नमिश्रकेयुक्त पानमसाला आदींची निर्मिती, साठवणूक, वितरण, वाहतूक व विक्रीवर प्रतिबंध आहे. हा प्रतिबंध माहीत असूनही आरोपी गुजरातमधील सुरत येथून प्रतिबंधित माल भरून भिवंडी येथे विक्री करण्याच्या उद्देशाने घेऊन जात असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले.

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास उदय पाठक करीत आहेत. कारवाईदरम्यान कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमर पाटील व तपासी अधिकारी उदय पाठक यांनी भेट देऊन पाहणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT