Kambare Vashind Heavy Vehicle Pudhari
पालघर

Kambare Vashind Heavy Vehicle: कांबारे-वाशिंद मार्गावर अजस्त्र वाहनांची मुजोरी

200 टन क्षमतेच्या वाहनामुळे पुलांना धोका; तानसा अभयारण्यातून वाहतुकीवर प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

वाडा : आमगाव गावाजवळील एका कंपनीतून कारखान्याचा अजस्त्र लोखंडी भाग वाहतूक करणाऱ्या वाहनाने वाडा शहरात मुक्काम ठोकला असून लवकरच हे अती अवजड वाहन वन विभागाच्या हद्दीतून जाणाऱ्या कांबारे-वाशिंद या मार्गाने जाणार आहे. पाली, गांधरे व सावरोली गावाजवळील नदीवर असणाऱ्या पुलांची अवस्था आधीच कमकुवत असल्याने हे शेकडो टन वजनाचे वाहन पुलांसाठी कर्दनकाळ बनणार आहे. आश्चर्य म्हणजे कोणतीही अधिकृत परवानगी न घेता हे वाहन वाहतुकीचे तीनतेरा वाजवीत निघून जाते, मात्र सार्वजनिक बांधकाम विभागासह वन विभागाचे अधिकारी हा प्रकार उघड्या डोळ्यांनी बघतात कसे असा लोकांचा सवाल आहे.

कांबारे-वाशिंद हा मार्ग तानसा अभयारण्यातून जात असून या मार्गावर अती अवजड वाहनांची येजा अनेक दिवसांपासून डोकेदुखी बनली आहे. वाशिंद ते कांबारे मार्गावर नुकताच एका कारखान्याची भव्य टाकी घेवून जाणाऱ्या वाहनाने सर्वांना वेठीस धरले असून यात वृक्षांचे मोठे नुकसान देखील झाले आहे. आता पुन्हा याच मार्गावरून अती अवजड वाहनं जाणार असल्याने वन विभाग याबाबत काय भूमिका घेईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. वन्यजीव विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक दत्तात्रेय मिसाळ यांना याबाबत माहिती देण्यात आली असून ते नक्कीच कारवाई करतील अशी सामाजिक कार्यकर्त्यांना आशा आहे.

पाली व गांधरे गावाजवळील पूल आधीच कमकुवत असून सावरोली पुल धोकादायक बनल्याने अनेक दिवस जड वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. याच पुलांवरून आता 200 टन क्षमतेचे हे अजस्त्र वाहन जाणार असल्याने पुलांचे अस्तित्व धोक्यात आहे. वन विभागाच्या हद्दीतून हे अती अवजड वाहन विना परवानगी जाणार असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कोणतीही परवानगी नसल्याने हे वाहन कुणाच्या आशीर्वादाने पुढे सरकत आहे याचा प्रशासनाने शोध घ्यावा.
जयेश शेलार, सामाजिक कार्यकर्ते

वृक्षसंपदेचे मोठे नुकसान होणार

वाडा येथून जाणाऱ्या या अजस्त्र वाहनावरील कारखान्याचा भाग तब्बल 165 टन वजनाचा आहे अशी माहिती असून पिंजाळ व वैतरणा नदी पुलांवरून 25 टन क्षमतेहून अधिक वजनाच्या वाहनांना येजा करण्यासाठी मज्जाव आहे. आधीच जागोजागी एकेरी मार्ग असल्याने प्रचंड वाहतूककोंडी होणार असून वन विभागाच्या हद्दीतून जाताना वृक्ष संपदेचे मोठे नुकसान होणार आहे. महावितरण, पोलीस, वनविभाग व अन्य यंत्रणा या अवैध वाहतुकीला सहकार्य करीत असल्याचा लोकांचा आरोप असून खैरे-आंबिवली गावात मागील वाहनाच्या वेळी नागरिकांनी मज्जाव देखील केला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे याबाबत कोणतीही अधिकृत परवानगी नसल्याचे उप अभियंता संजय डोंगरे यांनी सांगितले होते. मात्र सध्या डोंगरे कोणताही प्रतिसाद देत नाहीत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT